क्रिकेटच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या राहुल द्रविडने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान भारतीय वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक होण्याचे मान्य केले आहे. दुबईमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडसोबत बैठक घेतली आणि यूएईमध्ये टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्यासाठी द्रविडला राजी केले. अशाप्रकारे आता रवी शास्त्रींचे युग संपेल आणि द्रविड त्यांची जागा घेईल. राहुल द्रविड २०२३ पर्यंत संघाचा प्रशिक्षक राहील. दुसरीकडे, पारस म्हांब्रेची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. बीसीसीआयने कोणत्याही प्रशिक्षकाच्या पदासाठी अधिकृतपणे कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नव्हती. याबाबत, बीसीसीआयच्या उच्चपदस्थाने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) रात्री आयपीएल फायनल दरम्यान सांगितले, ‘राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होतील. ते लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख पदाचा राजीनामा देतील.’
विक्रम राठोडच राहणार फलंदाजी प्रशिक्षक
यासह, द्रविडचा विश्वासू सहकारी पारस म्हांब्रेची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची जागा घेतील, तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या बदलीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विक्रम राठोड संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.
शास्त्री आणि कंपनीचा संपतोय कार्यकाळ
रवी शास्त्री यांना न्यूझीलंड मालिका होईपर्यंत त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती करावी, असा विचारही मंडळाने सुरुवातीला केला होता. पण नंतर त्यांनी आपला विचार बदलला. अलीकडेच राहुल द्रविडने श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या द्वितीय श्रेणीच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी मुख्य संघ इंग्लंडमध्ये मालिका खेळत होता. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत तीन टी२० आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. हा दौरा टी -२० विश्वचषकानंतर लगेच होईल.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपत आहे. भारतीय संघाचे ट्रेनर निक वेब यांनाही टी२० विश्वचषकानंतर दिलासा मिळणार आहे.