आठ फ्रॅंचाईजींनी सुरु झालेली आयपीएल २०२२ मध्ये १० फ्रॅंचाईजींची झाली. गुजरात आणि लखनऊने अतिरिक्त मनोरंजन द्यायचा विडा उचलला. पण प्रत्येक आयपीएल प्रेमीला नक्कीच आठवेल, २०११ मध्येही अशाच प्रकारे १० संघ खेळले होते. तेव्हा त्या दोन अधिकचे संघ होते पुणे वॉरियर्स इंडिया आणि कोची टस्कर्स केरला. पुण्याचा संघ तीन हंगाम खेळला. मात्र, कोचीने एकाच हंगामानंतर आपला आयपीएलचा संसार आटोपता घेतला. आज प्रत्येक बिझनेस ग्रुप, बिझनेसमॅन आयपीएल नावाच्या या ग्लोबल ब्रँडचा भाग होण्यासाठी धडपडत असताना, कोची आयपीएलमधून एकाच वर्षात बाहेर का पडली? या प्रश्नाचे उत्तर देणारा हा लेख…
बीसीसीआयने २०१० मध्ये आयपीएल मोठी करण्याचा निर्णय घेतला. आणखी दोन नव्या फ्रॅंचाईजी आम्ही आयपीएलमध्ये उतरतोय, म्हणून बीसीसीआयने जाहिरात केली. याला प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला. देशातील आणि जगातील अनेकांनी संघ घेण्यासाठी इंटरेस्ट दाखवला. त्यात रॅंदेवूज स्पोर्ट्स लिमिटेडही होती. त्यांनीही नव्या फ्रेंचायजीसाठी टेंडर भरले होते. ज्या दिवशी टेंडर फुटले तेव्हा, पुणे फ्रॅंचाईजीसाठी त्यावेळी भारतातील सर्वात मोठा असलेल्या सहारा ग्रुपने १७०० कोटींपेक्षा जास्तची बोली लावली होती आणि दुसरी कोची फ्रॅंचाईजी मिळालेली रॅंदेवूज स्पोर्ट्स वर्ल्डला, १५५० कोटींमध्ये.
आपल्या पहिल्याच हंगामात कोचीने तगडा संघ बनवला. फ्रॅंचाईजीचे नाव ठेवले कोची टस्कर्स केरला. जयवर्धने, मॅकलम, मुरलीधरन, श्रीशांत, जडेजा ही सारी मंडळी त्यावेळी संघात होती. हंगाम सुरू झाला आणि संघाचा परफॉर्मन्स खालीवर होऊ लागला. हंगाम संपला तेव्हा ते ६ विजयांसह आठव्या नंबरला राहिले. पण संघ पुढे चांगला खेळणार असं सर्वांनाच वाटलं.
आयपीएल २०११ संपली आणि बीसीसीआय विरुद्ध कोची फ्रॅंचाईजी असा वाद सुरू झाला. खरंतर हंगाम सुरू व्हायच्या आधीच ठरल होत की, कोचीच्या ओनर्सनी १०% बँक गॅरंटी लवकरात लवकर जमा करावी. १५६ कोटींची ही रक्कम मिळावी म्हणून बीसीसीआय वारंवार फ्रॅंचाईजीला विनंती करत राहिली. पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. शेवटी हंगाम संपल्यावर सप्टेंबर महिन्यात तेव्हाचे बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी जाहीर केले की, कोची टस्कर्स केरलाला आयपीएलमधून बाहेर करण्यात आले आहे. तसेच पुढची आयपीएल फक्त नऊ संघ खेळतील असे देखील जाहीर करण्यात आले. कोचीच्या साऱ्या प्लेयर्सचे २०१२ मध्ये मिनी ऑक्शनही झाले. आता कोची टस्कर्स केरला अधिकृतरित्या आयपीएलमधून बाहेर झाली होती.
संघाचे मालक लगेच कोर्टात गेले. बीसीसीआय विरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली. पण बीसीसीआय आपल्या म्हणण्यावर ठाम होती. खरंतर त्या फ्रॅंचाईजीला अनेक को-ओनर्स होते. त्यात केंद्रीय मंत्री शशी थरूर हे देखील असल्याचे बोलले जाऊ लागले. पण त्यांनी हा आरोप धुडकावून लावला. मात्र, त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांची हिस्सेदारी फ्रॅंचाईजीमध्ये असल्याचे पुढे आले. तरीही कोर्टात केस सुरूच राहिली.
अखेर २०१५ मध्ये मुंबई हायकोर्टाचा निकाल आला आणि तो कोची फ्रॅंचाईजीच्या बाजूने लागला. कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले की, बीसीसीआयने फ्रॅंचाईजीला ५५० कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच तुम्ही पैसे दिले नाहीत तर, दरवर्षी १८% व्याज द्यावे लागेल. कोर्टाने दुसरा पर्यायही सुचवला की, पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही त्यांना आयपीएलमध्ये खेळवा. बीसीसीआय सगळ्याच बाबतीत कानाडोळा करू लागली. कोर्टाच्या बाहेर काहीतरी सेटलमेंट व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. पण कोचीचे मालक मागे हटायला तयार नव्हते.
आज २०२२ मध्येही ती सेटलमेंट झाली नाही. ५५० कोटींपासून सुरू झालेला आकडा व्याज, चक्रवाढ व्याज लागून आता २५०० कोटींच्या आसपास गेलाय. तरीही बीसीसीआय काहीही हालचाल करेना. अनेकदा प्रश्न पडतो की, बीसीसीआयने ही रक्कम दिलीच नाहीतर, आपण एखाद दिवशी कोची टस्कर्स केरलाला पुन्हा एकदा आयपीएल खेळताना पाहतो की काय?.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कोट्यवधी मने जिंकणाऱ्या धोनीचेच ‘या’ आर्टिस्टने जिंकले मन, चित्र पाहण्यासाठी स्वत: गेला माही
मुंबई इंडियन्सने दिली न विसरण्यासारखी जखम, आयपीएलनंतर ‘या’ अष्टपैलूचा मोठा उलगडा
कुणाला ऑटोग्राफ दिले, कुणाशी गप्पा मारल्या, तर कुणाला पॅड्स भेट दिले; नील वॅगनरचं होतंय कौतुक