इंडियन प्रीमीयर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा लोकप्रिय संघ आहे. त्यांची आयपीएलमधील यशस्वी संघांमध्येही गणना होते. आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्सने खेळलेल्या सर्व मोसमामध्ये प्लोऑफमध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी ३ वेळा विजेतेपदही मिळवले आहे.
चेन्नई संघाची इतक्या वर्षांची कामगिरी पाहिली तर त्यांनी त्यांच्या संघातील खेळाडूंमध्ये खूपदा कमी बदल केलेला आढळतो. त्यामुळे अनेक खेळाडू बऱ्याच काळासाठी चेन्नई संघाकडून खेळले आहेत. पण असेही काही खेळाडू आहेत, जे चेन्नईकडून काही सामने खेळले तसेच त्यांनी चांगली कामगिरीही केली मात्र सातत्य नसल्याने ते संघातून बाहेरही पडले आणि चाहत्यांच्या विस्मरणात गेले.
आता अनेक चाहत्यांना आठवतही नसतील अशा चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेल्या या ३ खेळाडूंचा आढावा –
१. अभिनव मुकुंद – तमिळनाडूकडून देशांतर्गत खेळत असलेला अभिनव मुकुंद २००८ च्या १९ वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होता. पण त्याला त्या विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. असे असले तरी त्याला २००८ ला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या पहिल्याच मोसमासाठी त्याला संघात सामील करुन घेतले होते.
त्यावेळी केवळ १८ वर्षांच्या अभिनवला २ सामने खेळण्याची संधी मिळाली मात्र यात त्याला केवळ एका चेंडूचा सामना करण्याची संधी मिळाली. या चेंडूवरही त्याला धावा करण्यात अपयश आले. तो शून्यावर नाबाद राहिला. त्यानंतर तो चेन्नईकडून खेळला नाही. तसेच त्यानंतर आयपीएलमध्ये तो केवळ १ सामना खेळू शकला. हा सामना त्याने २०१३ ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला. त्यात त्याला १९ धावा करण्यात यश आले.
असे असले तरी अभिनव भारताकडूनही ७ कसोटी सामने खेळला आहे. २०११ ला तो भारताकडून पहिला कसोटी सामना खेळला. तक २०१७ ला तो शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. पण तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरलेला नाही.
अभिनव हा सध्या तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असून त्याने दक्षिण विभाग, भारत अ आणि शेष भारत संघाकडूनही खेळला आहे. तो तमिळनाडूकडून १०० रणजी सामनेही खेळण्याचा कारनामा केला असून तो तमिळनाडूकडून ७००० धावा करण्याराही पहिला फलंदाज आहे.
२. मनप्रीत गोणी – भारताचा वेगवान गोलंदाज मनप्रीत गोणीने सुरुवातीला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना २००८ च्या आयपीएलमध्ये १६ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला भारताकडूनही खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या या कामगिरीमुळे तो पुढचे दोन मोसमही चेन्नईकडून खेळला. पण त्यानंतर त्याचा फॉर्म खराब झाला. त्यामुळे त्याला संघातील जागा गमवावी लागली.
नंतर त्याने डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले. पण २०१८च्या आयपीएल मोसमात तो अनसोल्ड राहिला. त्यानंतर त्याने मागीलवर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आता जगभरातील विविध लीग स्पर्धांमध्ये खेळतो. नुकताच तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजमध्ये इंडिया लिजंट्स संघाचा भाग होता. त्याने ४४ सामन्यात ३७ विकेट्स घेतल्या आहेत.
३. शादाब जकाती – भारताचा फिरकी गोलंदाज शादाब जकातीने चेन्नईकडून २००९ ते २०१२ या ४ मोसमात सामने खेळले आहेत. त्याने या ४ मोसमात ५० सामने खेळले. त्याने २००९ ला चांगली कामगिरी करताना ९ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या. त्याच्या पुढच्या मोसमातही त्याने ११ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या.
मात्र त्यानंतर त्याची कामगिरी खालावत गेली. त्याने २०११ आणि २०१२ च्या मोसमात प्रत्येकी १५ सामने खेळूनही त्याला २०११ ला १० आणि २०१२ ला ९ विकेट्सच घेता आल्या. त्यानंतर मात्र तो चेन्नई संघातून बाहेर पडला.
नंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात लायन्स संघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र २०१७ त्याने शेवटचा मोसम खेळला जकातीने मागीलवर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने आयपीएलमध्ये ५९ सामन्यात ४७ विकेट्स घेतल्या. यातील ४५ विकेट्स त्याने चेन्नईकडून खेळताना घेतल्या आहेत.