दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind test series) यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. विराट कोहली दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नव्हता आणि त्याच्या ऐवजी केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले. सामना संपल्यानंतर कर्णधार केएल राहुलने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण अफ्रिकेकडून पराभव मिळाल्यानंतर केएल राहुल म्हणाला की, “आम्ही जो कसोटी सामना खेळतो, तो आम्हाला जिंकायचा असतो. आम्ही त्यासाठीच त्याठिकाणी जातो आणि कडवे आव्हान देतो. मात्र, दक्षिण अफ्रिकेने प्रत्यक्षात चांगले प्रदर्शन केले आणि ते या विजयाचे हक्कदार होते. त्यांना १२२ धावा हव्या होत्या खेळपट्टी असमतोल होती. आमच्याकडे संधी होती, परंतु त्यांच्या फलंदाजांनी खरोखर चांगला खेळ केला. पहिल्या डावात आमची धावसंख्या ५० ते ६० धावांनी कमी होती. आम्ही अधिक धावा करून त्यांच्यावर दबाव बनवायला पाहिजे होता. शार्दुल ठाकुर आमच्यासाठी उत्तम ठरला. त्याने आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. पहिल्या डावात त्याने चांगली गोलंदाजी केली होती.”
राहुल संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेविषयी म्हणाला, “अनेक वर्षांपासून पुजारा आणि रहाणेने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. ते महान खेळाडू आहेत. आम्हाला विश्वास दाखवावा लागेल की, मधल्या फळीत पुजारा आणि रहाणे सर्वोत्तम खेळाडू आहेत. पुढच्या कसोटीसाठी त्यांना आत्मविश्वास मिळेल आणि पुढच्या कसोटीत ते अजून चांगले प्रदर्शन करतील. विराट कोहली ठीक आहे आणि त्याने क्षेत्ररक्षण देखील केले आहे. सिराजला आम्ही नेट्सवर पाहू. हॅमस्ट्रिंगनंतर पुनरागमन करणे सोपे नसते. उमेश आणि इशांतच्या रूपात आमच्याकडे चांगली बेंच स्ट्रेंथ आहे.”
दरम्यान, उभय संघातील या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २०२ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा केल्या. पहिल्या डावात अफ्रिकेने आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने २६६ धावा केल्या. शेवटच्या डावात अफ्रिकेला २४० धावांचे लक्ष्य मिळाले. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने ९६ धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. एल्गरला त्याच्या महत्वाच्या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी मोठा वाद! अव्वल मानांकित जोकोविचला विमानतळावरच रोखले
इशान पंडिताची कमाल! जमशेदपूर एफसीचा पिछाडीवरून विजय
तमिल थलाइवाजचा चौथा ‘टाय’; पटनासाठी मोनू गोयतनची ‘ऑलराउंड’ कामगिरी
व्हिडिओ पाहा –