आशिया चषक 2022 मधील सुपर फोर फेरीचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा पार पडला. शारजा येथे पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंकेने अनपेक्षित निकालाची नोंद करत विजयाचे दावेदार मानले जात असलेल्या अफगाणिस्तानला 4 गड्यांनी पराभूत करत आपली विजयी लय कायम राखली. भानुका राजपक्षे याची वेगवान खेळी श्रीलंकेसाठी महत्त्वाची ठरली.
Brilliant chase from Sri Lanka! 👊#RoaringForGlory #SLvAFG pic.twitter.com/X4KKcaH5ng
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 3, 2022
सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा अनुभवी सलामीवीर झझाई 13 धावा काढून बाद झाला. रहमानुल्लाह गुरबाजने आठ धावांवर मिळालेल्या जीवनाचा फायदा घेत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने अतिशय नेत्रदीपक फलंदाजी करत 45 चेंडूवर 4 चौकार व 6 षटकार लगावत शानदार 84 धावांची खेळी केली. त्याला इब्राहिम झादरानने 40 तर नजीबने 17 धावा करत साथ दिली. श्रीलंकेसाठी मदुशंकाने दोन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 176 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला पथुम निसंका व कुसल मेंडीसने 6.3 षटकात 62 धावांची सलामी दिली. दोघांनी अनुक्रमे 35 व 36 धावा केल्या. मधल्या फळीत धनुष्का गुणथिलकाने महत्त्वपूर्ण 33 धावांचे योगदान दिले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भानुका राजपक्षेने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत 14 चेंडूवर 31 धावांची खेळी केली. वनिंदू हसरंगाने अखेरपर्यंत नाबाद राहत 16 धावा केल्या. अखेरच्या षटकातील पाच चेंडू राखून श्रीलंकेने चार गड्यांनी विजय संपादन केला. अफगाणिस्तानसाठी शानदार 84 धावांची खेळी करणाऱ्या गुरबाजला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
सुपर फोरमध्ये आता हे दोन्ही संघ भारत व पाकिस्तानशी खेळतील. सुपर फोरमध्ये प्रत्येक संघाला तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांशी भिडतील. अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.