दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीनं भारतीय संघासाठी एक मोठा विक्रम केला आहे. तो भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसरा खेळाडू बनला. कोहलीनं या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहली तब्बल 8 वर्षांनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र टीम मॅनेजमेंटचा हा प्रयोग सपशेल अपयशी ठरला. कोहली या सामन्यात 9 चेंडूत भोपळाही न फोडता बाद झाला.
विराट कोहलीचा भारतासाठीचा हा 536 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं टीम इंडियासाठी 535 सामने खेळले आहेत. अशाप्रकारे भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या बाबतीत विराट कोहली एमएस धोनीच्या पुढे गेला. परंतु विराट अजूनही ‘क्रिकेटचा देव’ म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर पेक्षा 128 सामन्यांनी मागे आहे.
सचिन तेंडुलकरनं भारतीय संघासाठी सर्वाधिक 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. चौथ्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे. त्यानं भारतासाठी 504 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या यादीत टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. त्यानं आतापर्यंत टीम इंडियासाठी 486 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिल मानेच्या दुखण्यामुळे खेळू शकला नाही. यामुळे त्याच्या जागी विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. कोहली 2016 नंतर प्रथमच या क्रमांकावर खेळायला आला होता. मात्र तो खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
विराट कोहली गेल्या तीन सामन्यांमध्ये वेगवेगळ्या पोझिशनवर खेळला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो चौथ्या क्रमांकावर खेळला. दुसऱ्या कसोटी सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
हेही वाचा –
शून्यावर फेकली विकेट, बांगलादेश पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्धही विराट कोहली फ्लॉप!
भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीतून शुबमन गिल बाहेर, धक्कादायक कारण जाणून घ्या
रिकी पाँटिंगनंतर हा भारतीय क्रिकेटपटू होणार दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक