वंशवाद ही जागतिक समस्या आहे. सर्वच क्षेत्रात याची प्रकरणे आढळून आली आहेत, यास क्रिकेटही अपवाद नाही. त्यातल्या त्यात इंग्लंडच्या क्रिकेट व्यवस्थेत वंशवाद ही एक मोठी समस्या आहे. इंग्लंडमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आहे. आता इंग्लंडचा काउंटी संघ ‘यॉर्कशायर’ची देखील वर्णद्वेषाच्या बाबतीत पोलखोल झाली आहे. या संघाच्या काही खेळाडूंवर त्यांचा माजी कर्णधार अझीम रफिकने वर्णद्वेषी गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. आता हे आरोप तपासात सिद्ध झाले आहेत आणि यॉर्कशायरला या पीडित खेळाडूची माफी मागावी लागली आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली होती, ज्यात असे आढळून आले की इंग्लंडचा 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार अझीम रफिक हा अन्यायकारक वागणुकीचा बळी बनला होता.
रफीकने 2012 मध्ये यॉर्कशायरच्या टी-20 संघाचे नेतृत्व केले आणि नंतर काउंटी संघाचा सर्वात तरुण कर्णधार बनला होता. यॉर्कशायरने एका निवेदनात तपास अहवालाचा हवाला देत म्हटले आहे, “अझीमने केलेले अनेक आरोप खरे आहेत आणि अजीम अन्यायकारक वागणुकीला बळी पडला हे दुःखद आहे. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.”
अझीम रफीक याने मुलाखतीत खुलासा केला होता की, “मी वांशिक भेदभावाबद्दल अनेक वेळा तक्रार केली पण कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही. मला माहित आहे की, जेव्हा मी यॉर्कशायरकडून खेळत होतो तेव्हा मी आत्महत्या करण्याच्या किती जवळ होतो. मी माझ्या कुटुंबाचे ‘व्यावसायिक क्रिकेटपटू’चे बनण्याचे स्वप्न पूर्ण करत होतो. पण आतून मी दररोज मरत होतो. मी कामावर जाताना घाबरायचो. मला दररोज या यातना सहन कराव्या लागायच्या.”
अजीम रफिकने यॉर्कशायर क्लबवर कठीण काळात त्याला एकट सोडल्याचे आरोपही केला. रफीक म्हणाला, “माझा मुलगा जन्मतः मृत झाला. त्यास मी थेट रुग्णालयातून अंतिम संस्कारांसाठी नेले होते. मला यॉर्कशायरने वचन दिले होते की, ते माझी काळजी घेतील, मला आधार देतील, पण त्यांनी मला ई-मेल पाठवुन कळवले की, तुला संघाच्या कारारातून मुक्त करण्यात येत आहे.”
30 वर्षीय रफिक पाकिस्तानी खेळाडू असून त्याने 39 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 35 लिस्ट-ए आणि 95 टी-20 सामनेही खेळले आहेत. रफिकने टी-20 मध्ये 102, लिस्ट-ए मध्ये 43 आणि प्रथम श्रेणीत 72 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तालिबान संकटानंतरही पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका खेळणार अफगाणिस्तान, ‘या’ देशात होणार सामने
बिग बींसमोर हॉट सीटवर असणार ‘हे’ २ दिग्गज क्रिकेटर्स; ‘केबीसी १३’चा पहिलाच एपिसोड होणार झक्कास