– शशांक कुलकर्णी
भारताने २००६ साली टी२० क्रिकेटचा पहिला सामना जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्यानंतर आजतागायत भरपूर सामने खेळून झाले आहेत. भारताकडून यादरम्यान टी२०त विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल तसेच अनेक खेळाडूंनी सलामीवीर म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे.
आपल्याला या खेळाडूंची सलामी आणि फलंदाजीची शैली परिचित आहेच. परंतु यासोबतच असे काही अन्य खेळाडू होऊन गेले आहेत, जे कदाचित आपण विसरला असाल किंवा आता ते फारसे आठवणारही नाहीत. परंतु त्यांनीही भारतीय टी२० क्रिकेट संघासाठी चांगली कामगिरी बजावली.
भारतीय टी२० संघाकडून सलामीला फलंदाजी करणारे ५ खेळाडू- You may not know these 5 Batsmen who have Opended in T20 Cricket for India
५. मनदीप सिंह
भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत की ज्यांना खूप कमी सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यातच काही खेळाडूंचा विचार केल्यास मनदीप सिंग (Mandeep Singh) हा मधल्या फळीचा फलंदाज आहे. परंतु त्याने भारतीय संघासाठी खेळतांना राहुलसोबत झिम्बाब्वे विरुद्ध सलमीची तडाखेबाज फलंदाजी केली. त्या सामन्यात मनदीपने सणसणीत अर्धशतक ठोकले.
त्याने २०१६ ला केवळ ३ सामन्यात सलामीला फलंदाजी केली. त्यात त्याने ८७ धावा केल्या. पण त्यानंतर मनदीपला भारतीय संघात खेळण्यासाठी म्हणावी तशी संधी मिळाली नाही.
४. दिनेश कार्तिक
भारतीय संघांचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) मागील काही वर्षे भारतीय संघासाठी खेळला आहे. परंतु यादरम्यान त्याच्या कारकिर्दीत बराच चढ-उतार पहायला मिळाला. कार्तिक हा मधल्या फळीचा फलंदाज आहे. यादरम्यान कार्तिकने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. दिनेश कार्तिकला एकूण २ वेळा सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्याची संधी मिळाली. एक वेळा मुरली विजय सोबत आणि दुसऱ्यांदा गौतम गंभीर सोबत.
त्याने २०१० ला २ सामन्यात सलामीला फलंदाजी केली. त्यात त्याने केवळ २९ धावाच केल्या होत्या.
३. नमन ओझा
भारतीय क्रिकेट संघामध्ये काही खेळाडूंची कारकिर्द ही चुकीच्या वेळी सुरु झाल्यामुळे त्यांचे क्रिकेटचे भविष्य खराब झाले. यामध्ये मध्यप्रदेशचा यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझा याचे नाव येऊ शकते. कारण ओझाला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली खरी, परंतु तो केवळ मोजण्याइतपत सामने खेळू शकला. याच दरम्यान त्याला टी२० सामन्यात सलामीवीर म्हणून संधी मिळाली. परंतु २०१० साली झिम्बाब्वेविरुद्धच्या २ सामन्यात खेळताना त्याने केवळ १२ धावाच करू शकला. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही.
२. रॉबिन उथप्पा
रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) हा भारतीय संघासाठी अत्यंत प्रतिभावान असा फलंदाज राहिला. आपल्या सुरुवातीच्या काळात भरपूर सामने खेळल्यानंतर त्याला सुरेख अशी कामगिरी करता आली नाही. सलामीवीर म्हणून उथप्पाने वनडे क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यानंतर मधल्या फळीत खेळायला सुरुवात केली.
गौतम गंभीत बरोबर टी२० सामन्यात रॉबिनने सलामीला फलंदाजी केली होती. तिथे त्याने ७१ धावांची भागीदारी केली होती. पण त्यानंतर त्याला कधीही संधी मिळू शकली नाही.
त्याने २००७ ते २०१२ यादरम्यान ३ सामन्यात सलामीला फलंदाजी केली. त्यात त्याने केवळ १९ धावाच केल्या होत्या.
१. इरफान पठाण
भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) एक वेगवान गोलंदाज होता. इरफानने गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले. यादरम्यान त्याने चांगली फलंदाजीही केली. इरफानला फलंदाजीत संधी मिळाली ती २०१२ मधील टी२० क्रिकेटमध्ये. ती पण थेट सलामीला. गौतम गंभीरबरोबर इरफानला ही संधी मिळाली, परंतु त्यात त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. आणि त्यामुळे पुन्हा त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळालीच नाही.
त्याने २०१२ साली २ सामन्यात सलामीला फलंदाजी करताना केवळ ३९ धावा कुटल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख-
-ना रोहित, ना गेल ‘या’ ३ क्रिकेटपटूंनी ठोकले आहे क्रिकेटमधील सर्वात लांब षटकार
-गोलंदाजीत अतिशय हटके विक्रम करणारे ४ भारतीय, कहर म्हणजे विराटही आहे यात सामील
-असे ‘बाप- लेक’ क्रिकेटर, ज्यांनी एकाच सामन्यात खेळताना केली ‘बाप’ कामगिरी