नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स कडून खेळताना दिनेश कार्तिकने उत्तम फिनिशरची बुमिका पार पाडली. त्याच्या जोरावर कार्तिकने तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. असे करत असताना कार्तिकने आपल्या नावे एका विक्रमाची नोंद केली आहे.
दिनेश कार्तिकनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत आपल्या कारकिर्दीत १५ वर्षे पूर्ण केली आहेत. १५ वर्षांच्या कारकिर्दीत कार्तिकने केवळ ३३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २७ डावात फलंदाजी करताना १५ वेळा नाबाद राहून ३३.३३ च्या सरासरीने आणि १४२.८५ च्या स्ट्राईक रेटने ४०० धावा केल्या. नाबाद ४८ ही त्याची टी२० सामन्यांतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरताच कार्तिकने लाला अमरनाथ आणि दिलीप वेनसरकर यांच्यासह खास यादीत प्रवेश केला. १९४८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण करणारे लाला अमरनाथ हे पहिले भारतीय ठरले. यानंतर, १९९१ मध्ये, दिलीप वेनसरकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण करणारे पहिले भारतीय होते. आता दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय टी२० च्या माध्यमातून या खास यादीत प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे कार्तिकने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना २००६ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळला होता. भारतीय संघाने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला. त्या सामन्यात दिनेश कार्तिक भारतीय संघाचा सदस्य होता. त्या सामन्यात फलंदाज म्हणून खेळताना दिनेश कार्तिकने २८ चेंडूत ३१ धावा केल्या आणि टीम इंडियाच्या ६ गडी राखून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO। लिव्हिंगस्टोनने फेकला खतरनाक बाऊंसर, फलंदाज थोचक्यात बचावला
राशिदची अष्टपैलू खेळी, अफगानिस्तानचा झिम्बाब्वेव ३-०ने विजय