टीम इंडिया १८ ते २२ जुन दरम्यान साऊथॅम्पटन येथे न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट प्रकाराचा विश्वचषक होत असून भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारतात आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते, परंतू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा अर्ध्यातच रद्द करण्यात आली असून बीसीसीआय योग्य वेळी तीचे पुन्हा आयोजन करणार आहे. अशातच सर्वांना वेध लागले आहेत ते आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे. यामुळे चाहत्यांसह अनेक दिग्गज हे सोशल मीडिया किंवा टेलिव्हीजनच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रीया देत आहेत. अनेक दिग्गजांनी त्यांची प्लेइंग इलेव्हन देखील निवडली आहे.अशातच भारताच्या माजी दिग्गज गोलंदाजाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणत्या गोलंदाजांना संधी दिली पाहिजे याबद्दल भाष्य केले आहे.
माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या या सामन्यासाठी कोणते गोलंदाज योग्य ठरु शकतात हे सांगितले आहे. यात त्याने जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, आर अश्विन व रविंद्र जडेजाला संधी दिली आहे. तर वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराजला पर्यायी गोलंदाज म्हणून निवडले आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना व इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी हंगामात दमदार कामगिरी केलेल्या गोलंदाजांना निवडण्याचा पर्याय आहे. अशातच मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदरची सध्याची कामगिरी पाहाता, त्यांना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता थोडी कमीच आहे.
राखीव खेळाडूंमध्ये शार्दुल ठाकूरच्या जागी सिराजला जागा देताना नेहराने फॉर्म ऐवजी अनुभवाला महत्त्व देण्याचे सुचविले आहे. ‘जर तुम्ही हिरव्या खेळपट्टीवर खेळायला जात असाल तर तुम्ही एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा विचार केला पाहिजे. तेव्हा तुमच्याकडे मोहम्मद सिराज हा एक चांगला पर्याय आहे असे मला सध्या वाटत आहे. परंतू बुमराह, इशांत व शमी यांना वेगवान गोलंदाज म्हणून तर आश्विन व जडेजाला फिरकीपटू म्हणून प्राधान्य द्यायला हवे,’ असे नेहरा टेलिग्राफशी बोलताना म्हणाला.
आश्विन व जडेजा फलंदाजी करतात व ते टीमचे फलंदाजीचे संतुलन चांगले राखु शकतात, असेही नेहराने अधोरेखित केले आहे. ‘अंतिम सामन्यासाठी आता केवळ एक महिना राहिला आहे. गोलंदाज सराव शिबीरादरम्यान कशी कामगिरी करतायेत, तसेच त्यांचा फिटनेस कसा आहे, या गोष्टींचा विचार करुन अंतिम संघाची निवड केली पाहिजे. परंतू आश्विन-जडेजासह खेळण्याचा फायदा हा भारताला खालच्या फळीतही फलंदाजीचे पर्याय उपलब्ध होण्याचा आहे. जर या दोघांची संघात निवड झाली तर गोलंदाजी विभागातील सर्व पर्याय संघाला मिळणार आहे,’ असेही नेहरा पुढे म्हणाला.
‘भारत व न्यूझीलंड संघाकडे चांगले पर्याय आहेत. परंतू बुमराह व शमी सपाट खेळपट्टीवर चांगली कामगिरी करतात. जर न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा विचार केला तर ट्रेंट बोल्ट एक चांगला गोलंदाज आहे तर नील वेंगनरकडे मोठा अनुभव आहे. जर खेळपट्टीवर चेंडू स्विंग झाला नाही तर टीम साऊदीची गोलंदाजी प्रभावी होण्याची शक्यता कमी आहे. काईल जेमिसन एक चांगला गोलंदाज आहे, परंतू त्याकडे अनुभवाची कमी आहे,’ असेही नेहरा पुढे म्हणाला.
४२ वर्षीय नेहरा भारतकाडून १७ कसोटी, १२० वनडे व २७ टी२० सामने खेळला असून त्याने १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१७मध्ये दिल्ली येथे फिरोजशाह कोटला स्टेडियमवर टी२० सामन्यात त्याने क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर समालोचन व आयपीएलमधील काही संघांना तो प्रशिक्षण देताना दिसला.
महत्त्वाच्या बातम्या –
चालु सामन्यात गोलंदाजाने घेतली फलंदाजाची फिरकी, चाहत्यांना हसू आवरनेही झाले कठीण