पाकिस्तान संघाच्या हाँगकाँगवरील धमाकेदार विजयानंतर आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (02 सप्टेंबर) शारजाहच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग संघात करा वा मरा लढत झाली. या लढतीत पाकिस्तानने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही प्रभावी प्रदर्शन करत 155 धावांनी विजयश्री प्राप्त केली. या लाजिरवाण्या पराभवासह हाँगकाँगचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आणि पाकिस्तानने सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे.
पाकिस्तानपूर्वी गट अ मधून भारतीय संघ सुपर-4 साठी (Super-4 Schedule) पात्र ठरवला आहे. तर गट ब मधून अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघांनी सुपर-4 मध्ये धडक मारली आहे. तर बांगलादेश आणि हाँगकाँग या संघांचा आशिया चषकातील प्रवास संपुष्टात आला आहे. उभय संघांना एकही सामना जिंकता आलेला नाही. सुपर-4 संघांची नावे निश्चित झाल्यानंतर अंतिम वेळापत्रकही पुढे आले आहे.
सुपर-4 मध्ये पोहोचलेले चारही संघ राउंड रॉबिनच्या आधारावर प्रत्येक संघाविरुद्ध एक सामना खेळतील. सुपर-4 मधील पहिला सामना शनिवारी (03 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जाईल. त्यानंतर रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिद्वंद्वी संघात महामुकाबला रंगेल. पुढे भारतीय संघ श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्याविरोधात एक-एक सामना खेळेल. तर पाकिस्तानही अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा आमना सामना करेल.
सुपर-4 फेरीतील या 6 सामन्यांमध्ये टॉप-2 मध्ये राहणारे 2 संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतील. अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) होईल. हे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील.
शनिवार, 3 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान (शारजाह)
रविवार, 4 सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
मंगळवार, 6 सप्टेंबर- भारत विरुद्ध श्रीलंका (दुबई)
बुधवार, 7 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (दुबई)
गुरुवार, 8 सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दुबई)
शुक्रवार, 9 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (दुबई)
रविवार, 11 सप्टेंबर- अंतिम सामना (दुबई)
महत्त्वाच्या बातम्या-