इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडला होता. विशेष म्हणजे, या लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 8 वर्षे आपल्यासोबत खेळूनही युझवेंद्र चहल याला रिटेन केले नव्हते. त्यामुळे मेगा लिलावातही आरसीबी संघ त्याला खरेदी करू शकला नव्हता. अशात राजस्थान रॉयल्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. आरसीबीने संघात न घेतल्यामुळे चहल नाराज झाला होता. त्याने फ्रँचायझीचे प्रशिक्षक आणि इतर सदस्यांसोबत बोलणंही बंद केलं होतं. अशात त्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने आरसीबी संघाने खरेदी न केल्याविषयी म्हटले की, “मला खूप दु:ख झाले. माझा प्रवास आरसीबीपासून सुरू झाला. मी त्यांच्यासोबत 8 वर्षे घालवली. आरसीबीने मला संधी दिली आणि त्यांच्यामुळेच मला भारतीय संघाची कॅप मिळाली. पहिल्या सामन्यापासून विराट भैय्याने माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे वाईट वाटले. जेव्हा तुम्ही एका संघात 8 वर्षे घालवता, तेव्हा हे कुटुंबासारखे असते. खूप साऱ्या अफवा उडाल्या. जसे की, मी खूपच मोठी रक्कम मागितली. मी त्यावेळी स्पष्ट केले होते की, असे काहीही नव्हते. मला माहिती आहे की, माझी पात्रता काय आहे.”
‘पहिल्या सामन्यात केली नव्हती कुणाशीही चर्चा’
पुढे बोलताना चहल म्हणाला की, “मला ज्या गोष्टीचं वाईट वाटलं ती गोष्ट अशी होती की, मला कुणाचा फोनही आला नाही. कोणतीच चर्चा झाली नाही. कमीत कमी बोलायचं तरी. मी त्यांच्यासाठी 114 सामने खेळलो होतो. लिलावात त्यांनी मला वचन दिले होते की, ते मला घेण्याचा शक्य तो प्रयत्न करतील. मी म्हणालो, ठीक आहे. जेव्हा मला निवडले नाही, तेव्हा मी खूप रागावलो. मी त्यांना 8 वर्षे दिली. चिन्नास्वामी माझे आवडते मैदान होते. मी आरसीबीच्या प्रशिक्षकांशीही बोललो नाही. मी त्यांच्याविरुद्ध जो पहिला सामना खेळलो, त्यात मी कुणाशीही चर्चा केली नाही.”
राजस्थानविषयी काय म्हणाला चहल?
चहलने स्वीकारले की, राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघात गेल्याने एक गोलंदाज म्हणून त्याच्यात सुधारणा झाली. कारण, त्याने अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली होती. तो म्हणाला की, “मला जाणवले की, लिलाव ही एक खूपच अनपेक्षित जागा आहे. त्यामुळे मी गृहीत धरले की, जे काही होते, ते चांगल्यासाठी होते. राजस्थानमध्ये मी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी सुरू केली. आरसीबीमध्ये माझी षटके नेहमी 16 षटकांपूर्वीच पूर्ण व्हायची. त्यामुळे मला वाटते की, मी राजस्थानमध्ये एक क्रिकेटपटू म्हणून विकसित झालो आहे. जे काही झाले, ते चांगल्यासाठी झाले.”
चहलची आयपीएल कारकीर्द
युझवेंद्र चहल याच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 145 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 7.67च्या इकॉनॉमी रेटने 187 विकेट्स घेतल्या आहेत. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे. 40 धावा खर्चून 5 विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. ही कामगिरी त्याने आयपीएल 2022 (IPL 2023) हंगामात केली होती. (cricketer yuzvendra chahal on rcb snub after 8 years during 2022 ipl mega auction)
महत्वाच्या बातम्या-
‘शंकाच नाही, तो महानच…’, पहिल्या कसोटीत 12 विकेट्स घेणाऱ्या अश्विनचं कुणी गायलं गुणगान?
धोनीचा ‘असा’ व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल! अभिनेता योगी बाबूसोबत मस्ती करताना कॅमेऱ्यात कैद