सन २०२०- २०२१, पूर्ण क्रिकेटविश्वासाठी अतिशय वेदनादायी वर्ष ठरले. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या होत्या. क्रिकेटपटूंसह क्रिकेट चाहत्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. याबरोबरच वर्षभरात भारतीय क्रिकेटमधील बरेचसे दिग्गजही या महामारीमुळे हरपले. परंतु आता हळूहळू क्रिकेट पूर्वपदावर येत आहे.
आजपासून (१८ जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा बहुप्रतिक्षित अंतिम सामना रंगणार आहे. तत्पुर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू बी विजयकृष्ण यांचे निधन झाले आहे.
बी विजयकृष्ण यांचे दुःखद निधन
भारताचे माजी क्रिकेटपटू बी विजयकृष्ण यांचे गुरुवारी (१७ जून) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी त्यांना श्रद्धांजली दिली आहे. ते म्हणाले, “आपण एक महान क्रिकेटपटू गमावला आहे. देव त्यांच्या आत्माला शांती देवो. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की देव त्यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.”
बी विजयकृष्ण यांची क्रिकेट कारकिर्द
बी विजयकृष्ण यांनी १९६८-६९ मध्ये घरगुती क्रिकेटमध्ये कर्नाटककडून पदार्पण केले होते. त्यांचे क्रिकेट कारकिर्द ही १५ वर्ष चालली. ते एक डावखुरे फिरकीपटू आणि फलंदाज होते. ते आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून उत्कृष्ट प्रदर्शन करायचे. जेव्हा संघ अडचणीत असेल तेव्हा ते त्यांच्या खेळीने संघाला चांगल्या स्तिथीमध्ये आणायचे.
त्यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ८० प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी २५.८२ च्या सरासरीने २२९७ धावा केल्या होत्या . गोलंदाजीमध्ये त्यांनी १९४ विकेट्सही घेतल्या होत्या. त्यासमवेत त्यांनी २ लिस्ट ए सामने खेळले. त्यात त्यांनी १०.५ च्या सरासरीने २१ धावा केल्या होत्या. त्यासह ३ विकेट्सही घेतल्या होत्या.
याखेरीज १९७५-७६ च्या रणजी ट्रॉफी हंगामात महाराष्ट्रविरुद्धच्या उपांत्यपुर्व फेरी सामन्यात सर्वात वेगवान शतक करण्याच्या पराक्रम केला होता. त्यांनी १३८ मिनिटे फलंदाजी करताना १०२ धावा केल्या होत्या. १९८३-८४ मधील मुंबई विरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
अंतिम लढतीपुर्वी कोहलीचे भाष्य, म्हणाला, ‘५ दिवसांवरुन काहीही सिद्ध होणार नाही, मागील ५ वर्षे…’
नितीश राणाने ‘या’ खेळाडूकडून आयपीएलमध्ये घेतले फलंदाजीचे सल्ले