अमेरिकन क्रिकेट संघ सामन्यांमध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेमध्ये छाप सोडताना दिसत आहे. अर्थात यात भारतीय खेळाडूंचा मोठा वाटा आहे. पंजाबमध्ये जन्मलेल्या जसकरन मल्होत्राने काही दिवसांपूर्वी आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेत, पापुआ न्यू गिनीविरुद्ध नाबाद १७३ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात त्याने एका षटकात ६ षटकार मारण्याचा विक्रमही केला होता. आता सोमवारी (१३ सप्टेंबर) नेपाळविरुद्ध आणखी एका फलंदाजाने सुंदर शतक झळकावले आहे. मोनक पटेल असे या खेळाडूचे नाव असून तो गुजरातचा आहे.
ओमानच्या अल अमेरात येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात अमेरिकन संघ नेपाळविरुद्ध मैदानात उतरला होता. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शंभर धावांच्या आत नेपाळने अमेरिकन संघाच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. पण यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मोनक पटेलने सुंदर फलंदाजी करत डाव सावरला.
भारतात जन्मलेला २८ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज मोनक पटेलने सुरुवातीला थोडा संयम दाखवला. पण हळूहळू त्याने त्याच्या धावांची गती वाढवली. अर्धशतकानंतर त्याचे मनोबल वाढले आणि त्याने आपले दुसरे एकदिवसीय शतक झळकावले. त्याने शतक झळकावताच तो बाद झाला, पण त्याने ११४ चेंडूत १०० धावांची धमाकेदार खेळी करून सर्वांची मने जिंकली. या डावात मोनक पटेलने ९ चौकार आणि १ षटकार ठोकला. बाकीच्या फलंदाजांची त्यास योग्य साथ मिळाली नाही. म्हणून अमेरिकन संघ ५० षटकांत ९ गडी गमावून फक्त २३० धावा करू शकला. यावेळी जसकरण मल्होत्रा केवळ ११ धावा करू शकला.
अमेरिका संघाने नेपाळच्या संघासमोर २३१ धावांचे लक्ष्य होते. नेपाळसाठी कुशल भुरताळने ९३ चेंडूत ८४ धावा केल्या. मधल्या फळीतील रोहित पोडेलने ८७ चेंडूत नाबाद ६२ धावा खेळत नेपाळच्या संघाला ४९ षटकांत ५ गडी राखून विजय मिळवून दिला.
कोण आहे मोनाक पटेल
मोनक पटेलचा जन्म १ मे १९९३ रोजी आनंद, गुजरात येथे झाला होता. तो गुजरातच्या १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील संघातही सहभागी झाला होता. तो ऑगस्ट २०१८ मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता, जेव्हा त्याला आयसीसी टी-२० विश्वचषक अमेरिकन क्वालिफायर स्पर्धेसाठी, युनायटेड स्टेट्स संघात समाविष्ट करण्यात आले होते. त्या स्पर्धेत तो २०८ धावांसह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यानंतर, नोव्हेंबर २०१९ मध्ये जेव्हा त्याला अमेरिकन संघात प्रादेशिक सुपर-५० स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले, तेव्हा तो तिथेही २३० धावांसह अव्वल राहिला होता.
आतापर्यंत या गुजराती फलंदाजाने अमेरिकेकडून १६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२३ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलसाठी अफगाणिस्तानचे दोन खेळाडू यूएईत दाखल, संघव्यवस्थापन ठेवणार कुटुंबांवर लक्ष
टप्पा घेतला अन् सरळ दांडी गुल, अली खानच्या अचूक यॉर्करचा हा व्हिडिओ एकदा पाहाच
मानेच्या शस्त्रक्रियेनंतर ऑसी कर्णधार टिम पेन ऍशेस मालिकेसाठी उपस्थित राहणार का? वाचा काय म्हणाला