भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ ३४५ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडने दुसरे सत्र यशस्वीरित्या खेळून काढत बिनबाद ७२ धावा करून सत्र आपल्या नावे केले.
भारताची ३४५ पर्यंत मजल
पहिल्या दिवशीच्या ४ बाद २५८ वरून भारतीय संघाने खेळाला सुरुवात केली. मात्र, रवींद्र जडेजा पहिल्या दिवशीच्या धावसंख्येत (५०) एकाही धावेची भर न घालता माघारी परतला. यष्टीरक्षक वृद्धिमान साहा दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. मात्र, श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरत कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने १२ चौकार व २ षटकार ठोकत १०५ धावांची खेळी केली. त्यानंतर रविचंद्रन अश्विन वगळता (३८) आणखी कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. परिणामी, भारताचा डाव ३४५ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडसाठी टीम साऊदी याने सर्वाधिक पाच बळी आपल्या नावे केली.
न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दाखवले धैर्य
फिरकीपटूंना मदतगार असणाऱ्या ग्रीन पार्क येथील खेळपट्टीवर न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी अभूतपूर्व धैर्य दाखवले. दोघांनी दुसऱ्या सत्रात आक्रमण आणि संयम यांचा सुरेख ताळमेळ साधत २६ षटकांमध्ये ७२ धावा काढत न्यूझीलंडला दमदार सलामी दिली. यंग ४६ तर लॅथम २३ धावांवर नाबाद आहे.