मॅट हेन्री आणि विल्यम ओ’रुर्केच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडनं बंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला अवघ्या 46 धावांत गुंडाळलं. कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. टीम इंडियासाठी रिषभ पंतनं सर्वाधिक 20 धावा केल्या.
मॅट हेन्रीनं 5 विकेट्स आणि विल्यम ओ’रूकनं 4 विकेट्स घेऊन भारतीय फलंदाजांचं कंबरडं मोडलं. न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे 5 खेळाडू शून्यावर बाद झाले. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला होता. यानंतरही कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 9 धावांवर बाद झाला. रोहितला टीम साऊदीनं बाद केले. यानंतर विल्यम ओ’रूकनं विराट कोहलीला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. यानंतर हेन्रीनं सरफराज खानला बाद केलं. सरफराजला खातंही उघडता आलं नाही.
10 धावांत तीन विकेट पडल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. पण हे दोघेही किवी गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकले नाही. दोघांमध्ये 21 धावांची भागीदारी झाली. मात्र 31 धावांच्या एकूण धावसंख्येवर ओरूकनं जयस्वालला बाद केलं. त्याला एका चौकाराच्या जोरावर केवळ 13 धावा करता आल्या.
जयस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल क्रीजवर आला. मात्र राहुलही खातं न उघडता सहा चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनही शून्यावर बाद झाले. यानंतर जसप्रीत बुमराह एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारतानं अवघ्या 40 धावांत 9 विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियाची आज दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या होईल असं वाटत होतं. मात्र मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी किवी गोलंदाजांचा काही काळ सामना केला. ते दोघे फक्त 6 धावांची भर घालू शकले. अशाप्रकारे टीम इंडिया 46 धावांवर गडगडली.
कसोटीमध्ये भारताचा सर्वात कमी स्कोर
36 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ॲडलेड (2020)
42 विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, (1974)
46 विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू, (2024)
58 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन (1947)
58 विरुद्ध इंग्लंड, मॅनचेस्टर (1952)
हेही वाचा –
आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली! कधी आणि कुठे होणार लिलाव? जाणून घ्या
कोहली शून्यावर बाद होऊनही रेकॉर्ड बनवतो, या बाबतीत महेंद्रसिंह धोनीला टाकलं मागे
शून्यावर फेकली विकेट, बांगलादेश पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्धही विराट कोहली फ्लॉप!