भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे त्याच्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर रहाणे एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याआधी, लॉर्ड्स कसोटीत केलेल्या धावा आणि पुजारासोबतची भागीदारी याशिवाय रहाणेच्या बॅटमधून जास्त धावा आलेल्या नाहीत. रहाणेवर त्याच्या खराब कामगिरीमुळे आता जोरदार टीका होत आहे. मात्र, या टीकेला न जुमानता भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी त्याचा बचाव केला आहे.
राठोड यांनी म्हटले आहे की, रहाणे सध्या वाईट टप्प्यातून जात आहे आणि सध्या संघाला त्याची फारशी चिंता नाही. चाहत्यांना अपेक्षा आहे की, अजिंक्य रहाणे लवकरच चांगल्या फॉर्ममध्ये परत येईल, जसे चेतेश्वर पुजाराने या मालिकेमध्ये केले होते.
लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली चौथी कसोटी एक रोमांचक वळणावर पोहोचली आहे. भारताने आपल्या दुसऱ्या डावात ४६६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने बिनबाद ७७ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे, इंग्लंड आता लक्ष्यापासून २९१ धावा दूर आहे.
भलेही भारतीय संघाने इंग्लंडला भलेमोठे आव्हान दिले असले तरीही यामध्ये रहाणेचा काहीही वाटा राहिला नाही. महत्त्वाच्या क्षणी तो शून्यावर बाद झाला. तत्पूर्वी या सामन्याच्या पहिल्या डावातही त्याने अवघ्या १४ धावांचे योगदान दिले होते.
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रहाणेच्या फलंदाजीविषयी पत्रकार परिषदेत राठोड म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही इतके दिवस क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्याकडे असे टप्पे येतात, जिथे तुम्हाला धावा मिळत नाहीत. त्यामुळे ही एक वेळ असते, जेव्हा एक संघ म्हणून तुम्हाला त्याच्यापाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असते. आपण पुजाराला अधिक संधी मिळताना पाहिले आणि नंतर तो फॉर्ममध्ये परत आला, त्याने आमच्यासाठी काही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. आम्हाला आशा आहे की, अजिंक्य देखील फॉर्ममध्ये परत येईल आणि आपल्याला माहित आहे की तो अजूनही भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये प्रमुख भूमिका बजावतो. म्हणून, मला वाटत नाही की हे खूप चिंतेचे कारण आहे.’
जरी फलंदाजी प्रशिक्षकांनी रहाणेवर विश्वास दाखवला असला तरीही, त्याची या मालिकेतील आतापर्यंतची कामगिरी पाहून पुढील निर्णायक सामन्यात रहाणे साजेशी कामगिरी करु शकेल, अशी चिन्हे दिसत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
सरासरी गोलंदाजी, फ्लॉप फलंदाजी, आता ‘या’ गोष्टीतही चुकला; अंतिम कसोटीत जडेजाला नारळ पक्का!
अगग! स्वत: पंतनेही सोडली होती आशा; पण झालं असं काही की, तिघे मिळूनही करु शकले नाहीत धावबाद