येत्या काही महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१चा नवा हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे आयपीएल २०२०चे सहभागी ८ संघ आपापल्या रणनितीनुसार तयारी करत आहेत. दुसरीकडे आयपीएल गवर्निंग काउंसिल नव्या हंगामासाठी नवी रुपरेखा आखण्याच्या तयारीला लागले आहे. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी (०७ जानेवारी) स्पष्ट केले आहे की, आयपीएलच्या सर्व संघांनी कायम करु इच्छिणाऱ्या खेळाडूंची नावे गवर्निंग काउंसिलकडे सोपवावी.
भारतीय संघाचे माजी फलंदाज पटेल आणि आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या सदस्यांची या आठवड्यात ऑनलाइन मिटिंग झाली होती. यादरम्यान त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोबतच आयपीएल २०२१च्या लिलावाची तारिख अद्याप निश्चित झाली नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
न्यूज एजन्सी पीटीआयशी बोलताना पटेल म्हणाले, “२१ जानेवारीपर्यंत खेळाडूंना कायम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर आयपीएलच्या सहभागी संघांसाठी असणारी ट्रेडिंग विंडो ४ फेब्रुवारीला बंद होईल. तसेच आयपीएलच्या पुढील हंगामातील खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.”
आयपीएल फ्रँचायझींकडे असू शकणारी लिलाव रक्कम
आयपीएल २०२१च्या लिलाव रक्कमेविषयी बोलताना पटेल म्हणाले की, “आयपीएलच्या ८ संघांकडे खेळाडूंच्या खरेदीसाठी ८५ कोटी रुपयांची राशी असेल. मात्र लिलाव राशीमध्ये वाढ केली जाणार नाही.”
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाकडे गतवर्षीच्या लिलावानंतर फक्त १५ लाख रुपये उरले होते. अशात अपेक्षा केली जात आहे की, चेन्नई केदार जाधव आणि पियूष चावला यांच्या रुपात २ महागड्या खेळाडूंना रिलीज करेल व त्यांच्या रक्कमेत वाढ करेल. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ सर्व स्टार खेळाडूंना रिटेन करेल. कारण मुंबई संघातील बऱ्याच खेळाडूंनी आयपीएल २०२० मध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. मात्र १ कोटी ९५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये वाढ करण्यासाठी त्यांना काही खेळाडूंना रिलीज करावे लागणार आहे.
आयपीएल २०२१ लिलावासाठी राजस्थान रॉयल्स संघाजवळ सर्वाधिक १४ कोटी ७५ लाख रुपये असतील. तर सनराइझर्स हैदराबाद संघाकडे १० कोटी १० लाख रुपये असतील. आयपीएल २०२०चा उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघ ९ कोटींच्या रक्कमेसह लिलावात उतरेल. उर्वरित कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे ८ कोटी ५० लाख आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडे ६ कोटी ४० लाख रुपयांची राशी असेल.
माध्यमांतील वृत्तानुसार, आयपीएल २०२१च्या आयोजनासाठी आयपीएल गवर्निंग काउंसिल अजून एक महिना वाट पाहील. त्यानंतर कोविड-१९ परिस्थिती पाहता येत्या हंगामाचे आयोजन भारतात होईल का नाही?, यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत; पहिल्या सत्राखेर ऑस्ट्रेलियाच्या ५ बाद २४९ धावा
भारीच ना भावा! हवेत उंच उडी घेत ‘त्याने’ एका हाताने अडवला सिक्सर, व्हिडिओ तूफान व्हायरल
बुमराहने स्मिथची केलेली नक्कल पाहून सिराजला आवरले नाही हसू, पाहा व्हिडिओ