गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात हैदराबाद एफसीची अपराजित मालिका रविवारी पहिल्या लढतीत मुंबई सिटी एफसीविरुद्ध खंडित झाली. प्रत्येक सत्रात एक गोल करीत मुंबई सिटीने 2-0 असा सफाईदार विजय मिळवत गुणतक्त्यातील आघाडी वाढवली.
स्पेनच्या सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई सिटीचा हा सात सामन्यांतील पाचवा विजय असून एक बरोबरी आणि एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण झाले. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानवरील आघाडी त्यांनी तीन गुणांनी वाढवली, पण मुंबई सिटीचा एक सामना जास्त झाला आहे. पहिल्याच सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध पराभवाचा धक्का बसल्यानंतर मुंबई सिटीने सहा सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे. त्यांनी मोसमात चौथ्यांदा क्लीन शीट राखली आहे.
एटीकेएमबी सहा सामन्यांतून 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील बेंगळुरूचे सहा सामन्यांतून 12 गुण आहेत. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी सात सामन्यांतून दहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या 11 संघांमध्ये आता केवळ बेंगळुरू एफसी अपराजित आहे.
स्पेनच्या मॅन्युएल मार्क्वेझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हैदराबादला सहा सामन्यांत पहिलीच हार पत्करावी लागली. दोन विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे नऊ गुण व सहावे स्थान कायम राहिले.
मध्य फळीतील कर्नाटकचा 22 वर्षीय खेळाडू विघ्नेशने पहिल्या सत्रात मुंबई सिटीचे खाते उघडले. दुसऱ्या सत्रात आघाडी फळीतील इंग्लंडचा 34 वर्षीय खेळाडू अॅडम ली फाँड्रे याने भर घातली. अॅडमचा हा सात सामन्यांत पाचवा गोल आहे.
खाते उघडण्याच्या मुंबईच्या प्रयत्नांना 38व्या मिनिटाला यश आले. मध्य फळीतील अहमद जाहू याने ही चाल रचली. त्याने उजव्या बाजूला सुमारे 40 यार्ड अंतरावरून मारलेला चेंडू हैदराबादच्या गोलक्षेत्रात डावीकडे असलेला मध्यरक्षक बिपीन सिंग याच्याकडे गेला. बिपीनने चेंडूवर नियंत्रण मिळवले. त्याचवेळी लेफ्ट-बॅक विघ्नेश आगेकूच करीत होता. त्याने अचूक टायमिंग साधत पहिल्या फटक्यात चेंडू नेटमध्ये घालवताना हैदराबादचा गोलरक्षक सुब्रत पॉल याला संधी दिली नाही.
दुसऱ्या सत्रात 59व्या मिनिटाला अॅडमने लक्ष्य साधले. डावीकडून मध्यरक्षक रॉलीन बोर्जेस याने ही चाल रचली. त्याने गोलक्षेत्रात मध्यभागी असलेल्या अॅडमला अचूक पास दिला. अॅडमने ताकदवान फटका मारला. त्यावेळी प्रतिस्पर्धी गोलरक्षक सुब्रतने झेप टाकत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.
हैदराबादने सुरवात चांगली केली. पाचव्या मिनिटाला मध्य फळीतील महंमद यासीर याने सहकारी मध्यरक्षक हितेश शर्मा याला पास दिला. त्यातून चेंडू मिळताच सँटानाने हितेशला परत पास दिला. हितेशला फटका मात्र थोपवला गेला. अकराव्या मिनिटाला हैदराबादला कॉर्नर मिळाला होता. मध्य फळीतील हालीचरण नर्झारीकडे चेंडू येताच त्याचा कमकुवत फटका मुंबईने थोपवला. 15व्या मिनिटाला कॉर्नरवर बिपीनने डावीकडे मारलेल्या चेंडूवर प्रयत्न करण्याची बोर्जेसची संधी ऑफसाईडच्या सापळ्यामुळे हुकली. 66व्या मिनिटाला मुंबई सिटीचा तिसरा गोल थोडक्यात हुकला. बिपीनने ही चाल रचली होती.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०: सुपर-सब रहीममुळे चेन्नईयीनची गोव्यावर मात
– आयएसएल २०२०: कोल्हापूरचा युवा स्ट्रायकर अनिकेतच्या गोलमुळे जमशेदपूरची नॉर्थईस्टवर मात
– आयएसएल २०२०: ओडिशाला २-१ ने पराभूत करत बेंगळुरूची आगेकूच; मिळवला सलग दुसरा विजय