अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात २१ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. या सामन्यात कोलकाता संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. हा त्यांचा या हंगामातील दुसराच विजय आहे.
या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. हा निर्णय कोलकाताच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत पंजाबला २० षटकात ९ बाद १२३ धावांवर रोखले. त्यामुळे कोलकातासमोर विजयासाठी १२४ धावांचे आव्हान होते. हे आव्हान कोलकाताने सुरुवातीच्या विकेट्स लवकर गमावल्यानंतरही १६.४ षटकात ५ विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.
कोलकाताकडून १२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला शुबमन गिल आणि नितीश राणा उतरले होते. मात्र, पहिल्याच षटकात राणा शुन्यावर मोझेस हेन्रिक्सच्या गोलंदाजीवर शाहरुख खानला झेल देऊन बाद झाला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात ९ धावांवर शुबमनला मोहम्मद शमीने पायचीत केले. तर तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंग विरुद्ध खेळताना सुनील नारायण मोठा फटका मारण्याच्या नादात एकही धाव न करता झेलबाद झाला. त्याच्या अफलातून झेल डीप मिडविकेटला रवी बिश्नोईने घेतला.
पण त्यांनतर कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने अर्धशतकी भागीदारी करत कोलकाताला सावरले. यांची भागीदारी पंजाबसाठी डोकेदुखी ठरत असतानाच त्रिपाठी ११ व्या षटकात दीपक हूडाच्या गोलंदाजीवर शाहरुख खानकडे झेल देऊन ४१ धावांवर बाद झाला. त्याने मॉर्गनसह ६६ धावांची भागीदारी रचली. तो बाद झाल्यानंतर आंद्रे रसल फलंदाजीला आला. त्याने मॉर्गनला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो १० धावांवर १५ व्या षटकात अर्शदीप सिंगने केलेल्या थेट थ्रोमुळे धावबाद झाला.
पण त्यांनतर दिनेश कार्तिकने मॉर्गनला साथ देत कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्तिक २ चौकारांसह १२ धावांवर नाबाद राहिला. तर मॉर्गन ४० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावांवर नाबाद राहिला.
कोलकाताच्या गोलंदाजांची कमाल
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अगरवालने डावाची सुरुवात केली. मात्र, २० चेंडू १९ धावा करुन खेळपट्टीवर स्थिरावलेला केएल राहुल ६ व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर सुनील नारायणकडे झेल देऊन बाद झाला. त्याच्यापाठोपाठ ७ व्या षटकात धोकादायक ख्रिस गेलला शुन्यावर शिवम मावीने बाद केले. तर ८ व्या षटकात दीपक हूडा केवळ १ धाव करुन प्रसिद्ध कृष्णाविरुद्ध खेळताना ओएन मॉर्गनकडे झेल देऊन बाद झाला.
पण नंतर मयंक अगरवालने निकोलस पूरनला साथीला घेत पंजाबचा डाव पुढे नेला. मात्र मयंक ३१ धावा करुन १२ व्या षटकात सुनील नारायणविरुद्ध खेळताना बाद झाला. त्याच्यानंतर मोझेस हेन्रिक्स(२), पूरन(१९), शाहरुख खान (१३) आणि रवी बिश्नोई(१) हे देखील कालांतराने बाद झाले. अखेर ख्रिस जॉर्डनने आक्रमक खेळी केली. मात्र तोही अखेरच्या षटकात १८ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार मारुन ३० धावांवर बाद झाला. अखेर पंजाबने २० षटकात १२३ धावा केल्या. २० षटकांअखेर मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग प्रत्येकी १ धावांवर नाबाद राहिले.
कोलकाताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच पॅट कमिन्स आणि सुनील नारायणने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर शिवम मावी आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
कोलकाताने जिंकली नाणेफेक
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात सोमवारवारपासून (२६ एप्रिल) अहमदाबाद आणि दिल्ली येथील सामन्यांना सुरुवात होत असून पुढील आठवडे या दोन ठिकाणी सामने होणार आहेत. तसेच सोमवारी आयपीएल २०२१मधील २१ वा तर अहमदाबादमधील पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
असे आहेत ११ जणांचे संघ –
कोलकाता नाइट रायडर्स: नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, सुनील नारायण, ओएन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्ण, वरुण चक्रवर्ती.
पंजाब किंग्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, दीपक हूडा, निकोलस पूरन, मोझेस हेन्रिक्स, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.