कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आयसीसीने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघामध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु, विराट कोहली प्लेइंग ११ मध्ये कोणाला स्थान देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. असे म्हटले जात आहे की, फिरकी गोलंदाज आर अश्विन याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाण्याची दाट शक्यता आहे. अश्विनने उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी करून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु अश्विनची परदेशातील कामगिरी निराशाजनक आहे. ज्यामुळे विराट कोहलीच्या चिंतेत वाढ होऊ शकते.
परदेशात अश्विनची निराशाजनक कामगिरी
अश्विनची परदेशातील कामगिरी पहिली तर जाणवेल की दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांमध्ये अश्विनला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे.
परंतु अश्विन, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघासाठी मोलाची भुमिका बजावू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे, अश्विन डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करण्यात माहीर आहे. तसेच न्यूझीलंड संघातील वरच्या फळीतील फलंदाजांमध्ये डाव्या हाताचे फलंदाज आहेत. त्यामुळे अश्विन देखील भारतीय गोलंदाजी आक्रमणात मोलाची भूमिका बजावू शकतो.
डाव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध अश्विनची घातक गोलंदाजी
अश्विनने डाव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. न्यूझीलंड संघाची हीच प्लेइंग ११ विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात असेल तर न्यूझीलंड संघाकडून ५ डाव्या हाताचे फलंदाज खेळताना दिसून येतील.
आपल्या कारकीर्दीत अश्विनने २०७ वेळा डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद केले आहे. तसेच २०२ वेळा उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना बाद केले आहे. त्यामुळे अश्विन या सामन्यात भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकतो.
वरच्या फळीतील फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करताना ही अश्विनने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या ३ क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना ८१ वेळेस माघारी धाडले आहे. न्यूझीलंड संघातही टॉम लेथम आणि डेवोन कॉनवेसारखे आक्रमक फलंदाज आहेत. आर अश्विनवर या फलंदाजांना बाद करण्याची जबाबदारी असणार आहे.
तसेच कर्णधार केन विलियमसन विरुद्ध खेळतानाही आर अश्विनने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विलियमसनला त्याने ५ डावात ४ वेळेस माघारी धाडले आहे. यासोबतच टॉम लेथमला ४ वेळेस आणि रॉस टेलरला ३ वेळेस बाद करण्यात अश्विनला यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-न्यूझीलंड संघातील ‘या’ ५ खेळाडूंमध्ये आहे खास नाते; १३ वर्षांपासून करत आहेत एकमेकांचा पाठलाग
‘दादा’ गिरी! ट्रोल झाल्यानंतरही गांगुली यांनी पुन्हा पोस्ट केले ‘ते’ छायाचित्र
कलम ३७० चा भारतीय वाहिन्यांना बसणार आर्थिक फटका? क्रिकेट प्रक्षेपणासाठी भारतीय कंपन्यांना दिला नकार