संयुक्त अरब अमिरात येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर असून, ही भारताची टी२० विश्वचषकातील आत्तापर्यंतची सर्वात गचाळ कामगिरी ठरू शकते. त्याचवेळी, या विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व बदलले जाणार आहे. याबाबतची अंतिम घोषणा पुढील दोन दिवसात होऊ शकते.
विश्वचषकापूर्वी नियमित भारतीय कर्णधार विराट कोहली याने टी२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली होती. त्याच्या जागी रोहित शर्मा याला कर्णधार बनविण्यात येऊ शकते. या मुद्द्यावर बोलताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले,
“विराटनंतर रोहित कर्णधार बनेल हे सर्वश्रुत आहे. केवळ हा निर्णय जाहीर करण्याची औपचारिकता बाकी असून, येत्या दोन दिवसात बीसीसीआयची बैठक होणार असून, याबाबतची घोषणा केली जाईल.”
या अधिकाऱ्याने पुढे बोलताना म्हटले,
“पुढील वर्षी भारतीय संघ आणखी एक टी२० विश्वचषक व २०२३ मध्ये वनडे विश्वचषक खेळणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारात वेगवेगळा कर्णधार नसावा अशी आमची इच्छा असून, केवळ एकाच खेळाडूने या दोन्ही प्रकारात देशाचे नेतृत्व करावे. त्यामुळे कदाचित रोहित टी२० सोबत वनडे संघाचा देखील कर्णधार होऊ शकतो.”
द्रविड होणार मुख्य प्रशिक्षक
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेदेखील या स्पर्धेनंतर पदमुक्त होणार आहेत. बीसीसीआयमधील मोठा गट माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड याला हे पद देण्यासाठी इच्छुक असून, द्रविडने पदासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे शास्त्री यांच्यानंतर द्रविड भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक बनू शकतो. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल.
विश्वचषकानंतर खेळणार न्यूझीलंड विरुद्ध
टी२० विश्वचषक संपल्यानंतर केवळ दोन दिवसांच्या अंतरात भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी विद्यमान संघातील जवळपास ८-९ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. आगामी विश्वचषकाच्या संघ बांधणीच्या अनुषंगाने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
शमी आणि चक्रवर्तीची होणार सुट्टी? अफगानिस्तानविरुद्ध ‘या’ २ भारतीय गोलंदाजांची होऊ शकते एन्ट्री
‘या’ ३ अनफिट खेळाडूंवर विश्वास दाखवून निवडकर्त्यांनी केली चूक? टी२० विश्वचषकात ठरतायत फेल
अफगानिस्तान संघाचे अस्त्र आहेत ‘हे’ २ गोलंदाज, टीम इंडियाही तगड्या ‘मास्टरप्लॅन’सह घेणार समाचार!