सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्न पुन्हा एकदा तुटले आहे. तरीदेखील या सामन्यात असा एक गोलंदाज होता, ज्याने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजांना अडकवून ठेवले होते. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरने या गोलंदाजाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना १३८ धावा केल्या होत्या. या दरम्यान कर्णधार विराट कोहलीने ३९ धावांची खेळी केली होती. तर देवदत्त पडीक्कलने २१ धावांचे योगदान दिले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १९. ४ षटकात आव्हान पूर्ण केले आणि विजय मिळवला.
शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून युझवेंद्र चहलने कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते.
युझवेंद्र चहलने या डावात ४ षटक गोलंदाजी केली होती, ज्यामध्ये त्याने अवघ्या १६ धावा देत २ गडी बाद केले होते. यादरम्यान त्याने राहुल त्रिपाठी आणि नितीश राणाला बाद करत माघारी धाडले होते.
या अप्रतिम कामगिरीचे कौतुक करत माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी म्हटले की, “जर लक्ष्य आणखी जास्त असते तर, कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजांनी आणखी जोखीम घेतली असती. यावरून स्पष्ट होते की, तो किती चांगली कामगिरी करतोय. असे वाटत होते की, कुठलाही फलंदाज त्याच्याविरुद्ध फलंदाजी करताना जोखीम घेण्याचा प्रयत्न करत नव्हता. कदाचित कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या संघ व्यवस्थापकांनी त्यांच्या फलंदाजांना युझवेंद्र चहल विरुद्ध जोखीम घेऊ नका, असे सांगितले असेल.”
“हा सामना केवळ युझवेंद्र चहलमुळेच शेवटच्या षटकापर्यंत गेला. राहुल त्रिपाठी युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला तर, नितीश राणा देखील मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. या दोन्ही फलंदाजांना बाद करणे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी खूप महत्वाचे होते,” असे संजय मांजरेकर ईएसपीएन क्रिकइन्फोवर बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
रवी शास्त्रींनंतर कधी मिळणार टीम इंडियाला नवा प्रशिक्षक? महत्त्वाची माहिती आली समोर
राष्ट्र प्रथम! टी२० विश्वचषकात टीम इंडियाच्या मेंटाॅरशीपचा धोनी घेणार नाही एकही रुपया