इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे. मात्र, भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये सहभागी होण्याची परवानगी अद्याप तरी देण्यात आलेली नाही. पण, जेव्हा भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल, तेव्हा तिथेही भारतीयांचेच वर्चस्व असणार.
कारण, भारतीय क्रिकेटपटूंचे फक्त मायदेशातच नव्हे तर परदेशात देखील चाहते आहेत. ज्याप्रकारे आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंना संघाचा कर्णधार बनण्याची संधी असते. त्याप्रमाणेच भारतीय खेळाडूंनाही परदेशी लीगमध्ये संघाचे नेतृत्वपद देण्यात येऊ शकते.
या लेखात आपण अशाच ३ भारतीय खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांची बिग बॅश लीग आणि द हंड्रेड अशा परदेशी लीगमध्ये कर्णधार म्हणून निवड होऊ शकते.
हे ३ भारतीय खेळाडू बनू शकतात बीबीएल आणि द हंड्रेड लीगचे कर्णधार
3 Indian Players Might Be Captains In BBL And The Hundred League
१. रोहित शर्मा :
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. शिवाय तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारही आहे. २०१३मध्ये रिकी पाँटिंगने मुंबई इंडियन्सचे नेतृत्वपद सोडल्यानंतर रोहितकडे कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हापासून रोहितने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ असे ४वेळा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले आहे.
तसेच, भारतीय संघाला निदाहास ट्रॉफी आणि आशिया चषक जिंकून देण्यातही रोहितचे महत्त्वाचे योगदान आहे. जर, भारतीय क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आल्यास परदेशी लीगमधील फ्रंचायझी रोहितला कर्णधार बनवण्यासाठी कितीही मोठी रक्कम द्यायला तयार होऊ शकतात.
२. विराट कोहली –
भारताचा कर्णधार विराट कोहलीला क्रिकेट जगतात रनमशीन म्हणून ओळखले जाते. गेल्या दशकात तो क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून नावारुपाला आला आहे. जरी त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कोणता मोठा विजय मिळवला नसला, तरी भारतीय संघ सलग दमदार प्रदर्शन करत पुढे जात आहे.
विराट हा आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार आहे. दुर्दैवाने त्याच्या संघाने अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकली नसली, तरी तो आयपीएलमधील डिमांडिंग खेळाडू आहे. जर, त्याला परदेशी लीगमध्ये खेळायची संधी मिळाली, तर नक्कीच परदेशी फ्रंचायझी विराटकडे कर्णधारपद सोपवतील.
३. सुरेश रैना –
भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना गेल्या २ वर्षांपासून भारतीय संघातमधून बाहेर आहे. त्याने २०१८मध्ये इंग्लंडविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. परंतु, रैना हा आयपीएलच्या चेन्नई सुपर किमग्स संघाचा उपकर्णधार आहे. कर्णधार एमएस धोनीच्या अनुपस्थित तोच आपल्या संघाचे नेतृत्व करतो. रैना हा खूप चांगला कर्णधार बनू शकतो.
रैनाचे आयपीएलमधील प्रदर्शन राहता बीग बॅश लीग किंवा द हंड्रेड लीगमदले फ्रंचायझी त्याला पहिल्यांदा आपल्या संघात स्थान देऊ शकतात. त्याची क्रिकेटच्या छोट्या स्वरुपातील कामगीरी दमदार असल्यामुळे तो परदेशी लीगचा उत्कृष्ट कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज बनू शकतो.