ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (११ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यांत पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने पाच गडी राखून १७७ धावांचे लक्ष्य गाठले. या सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कोणती चूक संघाकडून झाली याबद्दल खुलासा केला आहे.
सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आणि म्हटले की, या दोघांनी अद्भूत खेळी खेळली. दुसरीकडे, सलग पाच सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहचलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम पराभवामुळे चांगलाच निराश झाला. तो म्हणाला की संघाचे क्षेत्ररक्षण खराब राहिले होते आणि महत्त्वाच्या वेळी झेल सोडणे संघाला महागात पडले.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला, ‘सर्व काही आमच्या रणनीतीनुसार चालले होते. आमची धावसंख्याही चांगली होती, पण आमची गोलंदाजी तेवढी अचूक नव्हती. अशा प्रसंगी जर झेल सोडले, तर सामना हातातून जातो, हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरला.’
पाकिस्तानच्या कर्णधाराने मात्र संपूर्ण स्पर्धेत आपल्या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आणि आशा व्यक्त केली की खेळाडू आणखी चांगले खेळतील. बाबर पुढे म्हणाला, ‘आम्ही ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धा खेळली ते विलक्षण होते. आगामी काळात संघाकडून अजून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका चोख बजावली.’
बाबर आझमच्या संघाने प्रथमच विश्वचषकात भारताचा पराभव केला होता. साखळी फेरीत न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले.
सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच म्हणाला, ‘एका वेळी मला वाटले होते की सामना आपल्या हातातून जाईल की काय, पण वेडने ज्या प्रकारे संयम राखला ते विलक्षण होते. त्याची स्टॉयनिससोबतची भागीदारी अप्रतिम होती. जे संघासाठी महत्त्वाचे ठरले. आम्हाला आमच्या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, संघातील सर्व खेळाडू विजयात योगदान देतात.’ फिंचने मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अशा स्थितीत वेडने १९ व्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीला सलग तीन षटकार ठोकत संघाला लक्ष्यापर्यंत नेले. त्याने नाबाद ४१ धावा केल्या आणि स्टॉयनिसने नाबाद ४० धावा केल्या. दोघांनी सहाव्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. वेडला हसन अलीने १९ व्या षटकात जीवदान दिले होते, त्यानंतर त्याने तीन षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या –
आझमचा विराटच्या आणखी एका विश्वविक्रमाला धक्का! ‘या’ यादीत मिळवला अव्वल क्रमांक