क्रिकेटच्या खेळात मोठमोठे वाद होत असतात. आता कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल 2024) मधील पंचांनी निर्णय बदलण्याचा मुद्दा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरं तर, सीपीएलमधील त्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) विरुद्ध अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स (एबीएफ) या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू इमाद वसीमने त्याच्याविरुद्धच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तो नाबाद असताना त्याला मैदानाबाहेर पाठवण्यात आले. मात्र काही वेळाने त्याला परत बोलावले गेले.
या सामन्यात एबीएफ संघाने 135 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुनील नरेनने हसन खानला 36 धावांवर यष्टिचित केले. पुढच्याच चेंडूवर इमाद वसीमविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपील होते, त्याला पंचांनी नाबाद घोषित केले. वसीम म्हणत होता की, चेंडू आधी त्याच्या बॅटला लागला. नाइट रायडर्सचा कर्णधार कायरन पोलार्डने डीआरएसचे संकेत दिले. रिव्ह्यूनंतर पंचांनी आपला निर्णय बदलला आणि वसीमला बाद घोषित केले.
निर्णय बदलल्यानंतर वसीमने पंचांकडे जाऊन चेंडू आधी बॅटला लागल्याचे सांगितले. वसीमला मैदान सोडावे लागले आणि त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. दरम्यान, एबीएफ संघाचे सहाय्यक प्रशिक्षक कर्टली ॲम्ब्रोस हे रिप्ले पाहिल्यानंतर डगआऊटमधून बाहेर आले. त्यांनी रागाने हातवारे करत पंचांना आंधळे आहेत का? असा सवाल केला. संघाने अपील केल्यानंतर मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलला आणि वसीमला पुन्हा खेळण्यासाठी बोलावले.
वसीम परतल्यानंतर नाइट रायडर्सचा कर्णधार पोलार्डने मैदानावरील पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. नाईट रायडर्सचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनीही डग आऊटमधून काही संकेत दिले. या कारणांमुळे सुमारे 12 मिनिटे मैदानात गोंधळ उडाला. नाबाद ठरवल्यावर वसीम याने फाल्कन्सला विजय मिळवून देण्यासाठी 27 चेंडूंत 36 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडसाठी 200 वनडे विकेट घेणार पहिला फिरकीपटू, 36 वर्षीय दिग्गजाची ऐतिहासिक कामगिरी
क्रिकेटच्या मैदानावरील वादाला हिंसक वळण, खेळाडूंनी एकमेकांना बॅटने केली मारहाण – Video