आगामी टी२० विश्वचषकासाठी नुकतीच भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीने हा संघ निवडला. संघाचे नेतृत्व विराट कोहलीच्या हाती देण्यात आले असून, माजी कर्णधार एमएस धोनीला संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. विश्वचषक सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी असला तरी, भारतीय संघासमोर व कर्णधार विराट कोहलीसमोर असे चार प्रश्न आ वासून उभे आहेत, ज्यांची उत्तरे त्याच्याकडे सध्या तरी नाहीत.
१) कोण देणार सलामी?
आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, केएल राहुल व इशान किशन यांचा समावेश केला गेला आहे. त्यापैकी रोहितची जागा नक्की मानली जातेय. दुसऱ्या जागेवर अनुभवाच्या जोरावर राहुल दावा करू शकतो. मात्र, कर्णधार विराट कोहलीने यापूर्वी सलामीवीर म्हणून विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
२) मधल्या फळीचा पेचप्रसंग
विश्वचषकात भारतीय संघाच्या मधल्या फळीत कोणाला खेळवायचे? हा सर्वात मोठा प्रश्न कर्णधार विराट कोहलीसमोर असेल. मधल्या फळीतील सर्वच फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. स्वतः विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, पाचव्या क्रमांकावर रिषभ पंत, सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या हे खेळू शकतात. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील शानदार कामगिरी करून इशान किशनने देखील या जागेवर दावा सांगितला आहे.
३) फिरकीपटू म्हणून कोणाला मिळणार संधी?
या विश्वचषकासाठी भारतीय संघात पाच फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे. अनुभवी रविचंद्रन अश्विनने चार वर्षानंतर संघात पुनरागमन केले असून, राहुल चाहर व वरूण चक्रवर्ती हे आपला पहिलाच विश्वचषक खेळतील. याव्यतिरिक्त अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा व अक्षर पटेल संघात सहभागी आहेत. त्यामुळे, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते, हे पाहणे रंजक ठरेल.
४) वेगवान गोलंदाजीत कमी पर्याय
विश्वचषकासाठी भारतीय संघात केवळ तीन वेगवान गोलंदाजांची निवड झाली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार या तीन अनुभवी गोलंदाजांपैकी कोणत्या दोन जणांना पहिल्या सामन्यात खेळवायचे हा निर्णय विराटला घ्यावा लागेल.
आयसीसी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर.अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी.
राखीव- शार्दुल ठाकूर, दीपक चाहर व श्रेयस अय्यर.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/3-uncapped-player-will-prove-best-in-ipl-2021/
https://mahasports.in/nepali-cricketer-rohit-paudel-took-brilliant-catch-at-boundary-against-oman/
https://mahasports.in/top-10-richest-indian-cricketers/