टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. दुसरीकडे, गेल्या अनेक आठवड्यांपासून टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळण्याच्या चर्चा खूप रंगत आहेत. भारताचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी गौतम गंभीर आणि डब्ल्यूव्ही रमण यांच्यात शर्यत सुरु आहे, परंतु अद्याप बीसीसीआयने यावर कोणतेही स्पष्ट विधान केलेले नाही. आता या स्थितीत भारताकडे प्रशिक्षक नाही आणि अशा मध्ये संघ 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर निघाला आहे. तर मग जाणून घेऊया झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण साकारत आहे?
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचे कर्णधारपद शुबमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. दुसरीकडे, मुख्य प्रशिक्षकाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक राहतील. लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक असल्याने टीम इंडियासोबत झिम्बाब्वेला गेले आहेत. लक्ष्मण यांच्यासोबत एनसीएचे सपोर्ट स्टाफ शुभमन गिल आणि कंपनीला मदत करणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच सांगितले की, भारताला लवकरच नवीन मुख्य प्रशिक्षक मिळेल आणि या वर्षी संघ नवीन प्रशिक्षकासह श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळेल.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने एक निवेदन जारी केले होते की, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांना टी20 मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमधून वगळण्यात येत आहे. चक्रीवादळामुळे हे तीन खेळाडू सध्या टी20 विश्वविजेत्या संघासह बार्बाडोसमध्ये अडकले आहेत. त्यांना प्रथम भारतात परतावे लागेल आणि त्यानंतर त्यांना हरारे (झिम्बाब्वे )येथे पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. पहिल्या दोन सामन्यांमध्ये सॅमसन, दुबे आणि जयस्वाल यांच्या जागी साई सुदर्शन, हर्षित राणा आणि जितेश शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.
महत्तवाच्या बातम्या-
विद्या व्हॅली, विबग्योर इंटरनॅशनल स्कूलची बाजी – 17 वर्षांखालील गटात एसएनबीपी स्कूलचे वर्चस्व
मायकेल वॉन अन् अँड्र्यू फ्लिंटॉफची मुलं एकत्र करतील पदार्पण? इंग्लंडच्या अंडर-19 कसोटी संघात झाली एंट्री
10 षटकात 19 धावा अन् 6 विकेट…42 वर्षीय जिमी अँडरसनला खरंच तोड नाही..!!