१. गेल्या 11 वर्षांत इंग्लंडने वनडे सामन्यात फलंदाजी करताना पहिल्यांदाच तब्बल सात षटके निर्धाव खेळली आहेत. रविवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मॅनचेस्टर येथे झालेल्या दुसर्या वनडे सामन्यात हा अनोखा विक्रम झाला. मिशेल स्टार्क आणि मिशेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाकडून एक एक निर्धाव षटक टाकले. त्याच वेळी, पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन षटके निर्धाव फेकली, तर जोश हेजलवूडने दोन षटके निर्धाव टाकली.
२. ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर आणि सॅम करन यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसर्या वनडेत विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 24 धावांच्या फरकाने पराभूत केले.
३. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या डोक्याला झालेल्या दुखापतीचा वैद्यकीय अहवाल चांगला आला आहे. परंतु तरीही इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यातील अंतिम ११ जणांच्या संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते.“स्टीव्ह स्मिथ दोन्ही तपासणीत तंदुरुस्त असल्याचे आढळले आहे, परंतु खेळाडूची अधिक काळजी घेण्यासाठी आम्ही त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळावर बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले
४. मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला, चेन्नई सुपरकिंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. ऋतुराजच्या रविवारपासून दोन टेस्ट होतील, त्यामुळे तो इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.‘ऋतुराजच्या, नियमांनुसार आज आणि उद्या आणखी दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. जर तो निगेटिव्ह आढळला तर तो टीम हॉटेलमधील जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणाशी जोडला जाईल,” असे सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी रविवारी पीटीआयला सांगितले.
५. सोशल मीडियावर माजी खेळाडू विरेंद्र सेहवागचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो सांगतोय की, माजी खेळाडू आपले वय कागदावर मुद्दाम कमी का लिहायचे. यामागील कारण सांगताना तो म्हणतोय की, हे खेळाडू आपले वय फक्त यासाठी कमी करायचे की जेणेकरून ते १९ वर्षांखालील क्रिकेट खेळू शकतील आणि संघात आपले स्थान निर्माण करू शकतील.
६. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याची इंडियन प्रीमियर लीग टीम राजस्थान रॉयल्सने मेंटोर (मार्गदर्शक) म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच तो फ्रेंचायझीचा ‘ब्रँड अॅम्बेसेडर’ असेल. 2008 मध्ये फ्रेंचायझी सुरू झाल्यापासून वॉर्न राजस्थान रॉयल्सशी संबंधित आहे आणि त्याने त्याच्या नेतृत्वाखालीच पहिल्या वर्षी राजस्थान संघाला एकमेव इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपदही मिळवून दिले होते.
७. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सॅम बिलिंग्जने इंग्लंडकडून अविश्वसनीय खेळी खेळली आहे. “मला असं वाटत नाही की मी कितीही धावा केल्या तरी मी संघात कायम स्थान मिळवू शकतो. मी फक्त एक गोष्ट करू शकतो की माझ्या चांगल्या खेळीने मी संघाचा दरवाजा वाजवत राहील. विशेषत: टी२० साठी खालच्या क्रमांकावर एक जागा आहे. त्याजागी माझा विचार केला जाऊ शकतो,” असे दुसऱ्या सामन्यापूर्वी तो म्हणाला.
८. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथने आपल्या खेळाडूंसाठी एक मजेदार सत्र घेतले होते. या सत्रामध्ये त्यांना गोलंदाजांना परिपूर्ण यॉर्करसाठी प्रशिक्षण द्यायचे होते. प्रत्येक गोलंदाजाला 10 चेंडू देण्यात आले आणि निश्चित केलेल्या लक्ष्यानुसार एक, दोन आणि पाच गुण देण्यात आले. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली चांगल्या कामगिरीसाठी गोलंदाजांचा जयजयकार करीत होता. त्याच वेळी, गोलंदाज योग्य टप्प्यावर चेंडू टाकल्यानंतर तो गोलंदाजासोबत भांगडा करताना दिसला तर कधी त्यांना मिठी मारून आनंद साजरा करताना दिसून आला.
९. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली युएईमध्ये आयपीएल 2020 च्या तयारीमध्ये व्यस्त आहे, तर दुसरीकडे आरसीबीचा एक गोलंदाज इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत आहे, तो गोलंदाज म्हणजेच ऍडम झम्पा. त्याने इंग्लंडविरुद्ध रविवारी झालेल्या मँचेस्टर वनडे दरम्यान 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो 2019 पासून झम्पा वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे ही आरसीबी संघासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
१०. रविवारी अमेरिकन ओपन २०२० च्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीम आणि जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात पार पडला. या सामन्यात थीमने झ्वेरेवचा पराभव करत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. २७ वर्षीय थीम हा ओपन इरामधील अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पहिले २ सेट गमावल्यानंतर विजेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात पहिले २ सेट गमावल्यानंतर जिंकणारा एकूण पाचवा टेनिसपटू ठरला आहे.