कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) सुरु झाली असून पहिला सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर होत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारताने ८४ षटकांत ४ बाद २५८ धावा केल्या. पहिल्या दिवसाखेर श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजा अर्धशतकं पूर्ण करुन नाबाद माघारी परतले. तसेच न्यूझीलंडकडून पहिल्या दिवशी काईन जेमिसनने प्रभावित करताना ३ विकेट्स घेतल्या.
श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजाचे अर्धशतक
पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यरने भारताला भक्कम स्थितीत उभे केले. दुसऱ्या सत्रात तीन विकेट्स गमावल्यानंतर तिसऱ्या सत्रात मात्र, श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजाने चांगली खेळी करत धावफलक हलता राहिल याची दक्षता घेतली. या दोघांनीही आपली विकेट न गमावता शतकी भागीदारी रचली. त्यांच्या या भागीदारीने न्यूझीलंडचे गोलंदाज त्रासलेले दिसले.
दरम्यान, श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पण गाजवताना ६८ व्या षटकात टीम साऊथी विरुद्ध एकेरी धाव काढत पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याने ९४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही तो खराब चेंडूंचा समाचार घेत मोठे फटके मारताना दिसला. त्याला भक्कम साथ देणाऱ्या जडेजानेही ८३ व्या षटकात त्याचे १७ वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याने ९९ चेंडूत ही खेळी केली.
तिसऱ्या सत्रात एकही विकेट न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घेता आली नाही. ८४ षटकांनंतर खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी प्रकाश पुरेसा नसल्याने पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. पहिल्या डावात भारताने ८४ षटकात ४ बाद २५८ धावा केल्या. पहिल्या दिवसाखेर श्रेयस अय्यर १३६ चेंडूत ७५ धावांवर नाबाद राहिला. तसेच रविंद्र जडेजा १०० चेंडूत ५० धावांवर नाबाद राहिला. या दोघांनीही पाचव्या विकेटसाठी नाबाद ११३ धावांची शतकी खेळी केली आहे.
दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडचा दबदबा
पहिल्या दिवसाच्या भारताने पहिल्या सत्रात १ बाद ८२ धावा केल्यानंतर दुसऱ्या सत्रात मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच अर्धशतकवीर शुबमन गिलला ३० व्या षटकात काइल जेमिसनने ५२ धावांवर बाद केले. पाठोपाठ ३८ व्या षटकात चेतेश्वर पुजारा टीम साऊथीच्या गोलंदाजीचा सामना करताना २६ धावा करुन बाद झाला.
त्यानंतर मात्र, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पदार्पणवीर श्रेयस अय्यरने भारताचा जाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी मैदानात स्थिरावत होती. पण, असे असतानाच जेमिसनने भारताला चौथा धक्का दिला. त्याने रहाणेला ३५ धावांवर त्रिफळाचीत केले. ही जेमिसनची डावातील तिसरी विकेट ठरली. रहाणे बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजा ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.
त्याने अय्यरला साथ देताना दुसरे सत्र संपेपर्यंत न्यूझीलंडला आणखी यश मिळू दिले नाही. भारताने ५६ षटकात ४ बाद १५४ धावा केल्या आहेत. अय्यर १७ धावांवर नाबाद आहे. तसेच जडेजा ६ धावांवर खेळत आहे.
शुबमन गिलचे अर्धशतक
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून पहिल्या डावाची सुरुवात शुबमन गिल आणि मयंक अगरवाल यांनी केली. या दोघांनी चांगली सुरुवात करताना सावध खेळ केला होता. मात्र, या दोघांची जोडी फार काळ टिकून राहणार नाही, याची न्यूझीलंडने काळजी घेतली. अगरवाल ८ व्या षटकात बाद झाला. काइल जेमिसनने टाकलेला चेंडू त्याच्या बॅटची कड घेत यष्टीरक्षक टॉम बंडेलच्या हाती गेला. त्यामुळे अगरवालला २८ चेंडूत १३ धावांवर विकेट गमवावी लागली.
तो बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आला. त्याने शुबमन गिलला चांगली साथ देताना पहिल्या दिवसाखेरपर्यंत न्यूझीलंडला मोठे यश मिळू दिले नाही. गिलने दमदार खेळ करत २७ व्या षटकात विल्यम सोमरविलविरुद्ध १ धाव पळत काढत चौथे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक त्याने ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८१ चेंडूत पूर्ण केले.
त्यामुळे भारताला पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर २९ षटकांत १ बाद ८२ धावा करण्यात यश आले आहे. पहिल्या सत्राखेर गिल ५२ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर नाबाद आहे.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्त्व करत आहे. या सामन्यातून श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पण केले आहे. त्याला सुनील गावसकरांच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्यात आली. तो कसोटी पदार्पण करणारा भारताचा ३०३ वा खेळाडू ठरला आहे.
या सामन्यासह भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेतील आपापल्या मोहिमेला सुरुवात करतील.
🎥 A moment to cherish for @ShreyasIyer15 as he receives his #TeamIndia Test cap from Sunil Gavaskar – one of the best to have ever graced the game. 👏 👏#INDvNZ @Paytm pic.twitter.com/kPwVKNOkfu
— BCCI (@BCCI) November 25, 2021
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत – शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव.
न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, टिम साउथी, एजाज पटेल, काइल जेमिसन, विल्यम सोमरविल