आयपीएल २०२१ अंतिम सामन्यात शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकमेकांसमोर उभे ठाकतील. केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनचे अंतिम सामन्यात विजयासह एका अनोख्या विक्रमावर लक्ष असणार आहे. जर मॉर्गनने हा सामना जिंकला, तर तो आयपीएलमध्ये कर्णधारांच्या एका विशेष क्लबमध्ये सामील होऊ शकतो. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचे नेतृत्व करणारा मॉर्गन चेन्नईविरुद्ध हा सामना जिंकला, तर कर्णधार म्हणून आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा तो चौथा परदेशी खेळाडू ठरेल.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या क्लबमध्ये तीन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी त्यांच्या संघासाठी आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, हे तिघेही ऑस्ट्रेलियन दिग्गज आहेत. यामध्ये लेग स्पिनर शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट आणि सध्याचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर यांचा समावेश आहे.
१. शेन वॉर्नने २००८ साली जिंकली होती आयपीएल स्पर्धा
आयपीएलचा पहिला हंगाम २००८ मध्ये खेळला गेला. कर्णधार शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सच्या संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम फेरीत वॉर्नच्या संघाचा सामना कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स यांच्याशी झाला होता. मुंबईत खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात शेन वॉर्नने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजी करताना सीएसकेच्या संघाने पाच गडी गमावून १६३ धावा केल्या. सुरेश रैनाने संघासाठी ४३ धावा केल्या, याशिवाय पार्थिव पटेलने ३३ चेंडूत ३८ धावा आणि कर्णधार धोनीने १७ चेंडूत २९ धावा केल्या. राजस्थानकडून युसूफ पठाणने ४ षटकांत २२ धावा देऊन ३ बळी घेतले होते. १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने युसुफ पठाणच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर हा सामना सहज जिंकला आणि पहिले आयपीएल जेतेपद देखील पटकावले. पठाणने ३९ चेंडूत ५६ धावांची शानदार खेळी खेळली होती. पठाणला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
२. ऍडम गिलख्रिस्टने २००९ साली जिंकली होती आयपीएल स्पर्धा
सन २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सच्या संघाने स्फोटक सलामीवीर ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली आयपीएल चषक जिंकला होता. ऑस्ट्रेलियन खेळाडूने आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याचे हे सलग दुसरे वर्ष होते. यावेळी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली होती. जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सहा धावांनी पराभव केला होता.
३. डेविड वॉर्नरने २०१६ साली जिंकली होती आयपीएल स्पर्धा
सन २०१६ चा आयपीएल हंगाम डेविड वॉर्नरच्या जबरदस्त कामगिरीसाठी ओळखला जातो. या स्पर्धेत ८४८ धावा करणाऱ्या वॉर्नरने त्याच्या उत्कृष्ट कर्णधारपदाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयी बनवले होते. अंतिम सामन्यात वॉर्नरच्या संघाने प्रथम खेळताना २०८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. यानंतर, संघाने आरसीबीचा डाव २०० धावांवर रोखत सामना ८ धावांनी जिंकून जेतेपद पटकावले होते. बेन कटिंगला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
त्यामुळे मॉर्गनने आयपीएल विजेतेपद जिंकले, तर तोही परदेशी कर्णधारांच्या या खास यादीत सामील होईल. उर्वरित १० आयपीएल जेतेपदाबद्दल बोलायचे, तर हे सर्व भारतीय खेळाडू जिंकले आहेत. यापैकी पाच रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा आणि कोलकाता नाइट रायडर्ससाठी गौतम गंभीरने दोन वेळा आयपीएल चषक आपल्या नावे केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे बाप! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अविश्वसनीय डॉट चेंडू; क्रीझवर ३६० डिग्री फिरला फलंदाज
रोड टू फायनल!! असा राहिला चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्रवास
युएईत सबकुछ ऋतुराज! ‘ही’ आकडेवारी पाहून जाल चक्रावून