सोमवारी(११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना पार पडला होता. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवत क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. हा सामना कर्णधार म्हणून विराटच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
त्यामुळे आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार कोण? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. याबद्दल अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान इंग्लंडच्या माजी कर्णधाराने देखील एक पर्याय सुचवला आहे.
विराट कोहलीने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नियमित कर्णधारपद स्वीकारले होते. परंतु त्याला एकदाही जेतेपद मिळवून देता आले नाही. त्यामुळे त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर अनेकांनी असेही म्हटले होते की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ केएल राहुलला आपल्या संघात पुन्हा घेऊन त्याला कर्णधारपद देऊ शकतात. दरम्यान आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला वाटते की आगामी हंगामात जोस बटलरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करावे.
मायकल वॉनने क्रिकबजवर बोलताना म्हटले की, “रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात विराट कोहलीच्या जागेवर कर्णधार होणाऱ्या खेळाडूमध्ये एक गोष्ट असायला हवी, ती म्हणजे खेळाची उत्तम जाण. यासह त्याला टी२० क्रिकेटमधील लहानातल्या लहान गोष्टी देखील कळायला हव्या. तसेच त्याला खेळाडूंचे व्यवस्थापन करता यायला हवे. मुख्यतः विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडूंचे. कारण त्याने आता नेतृत्वपद सोडले आहे. तो आता संघातील एक वरिष्ठ खेळाडू आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी मी एक नाव सुचवतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल. तो दुसऱ्या फ्रँचायजीचा आहे. असे होऊ शकते की, त्याला आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याचा संघ रिटेन करेल. परंतु, मला असे वाटते की, जोस बटलरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करावे. त्याच्यात ते सर्व गुण आहेत, जे त्याला एमएस धोनी सारखे कर्णधार बनवू शकतात. मला यात काहीच शंका नाहीये.”
बटलर सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात!! ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने वनडेत ठोकले द्विशतक; अवघ्या ३६ चेंडूंमध्ये केल्या १६० धावा
बिग ब्रेकिंग! शार्दुल ठाकूरची टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात निवड, ‘या’ खेळाडूऐवजी मिळाले स्थान
केकेआरला सात वर्षांनंतर जिंकायचीय ट्रॉफी; मात्र, सेनापतीच्या बॅटला लागलाय गंज