बांगलादेश क्रिकेट संघाला जागतिक क्षितीजावर पाऊल ठेवून जवळपास ३६ वर्ष पुर्ण झाली. आशिया खंडातील भारत, पाकिस्तान व श्रीलंकेनंतरचा बांगलादेश हा चौथा असा देश होता, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर जवळपास ४ वर्षांनी बांगलादेशात अशा एका खेळाडूचा जन्म झाला, ज्याने पुढे बांगलादेशला खऱ्या अर्थाने क्रिकेट जगतात मानाचे स्थान मिळवून दिले. या संघाकडे लोक गांभीर्याने पाहू लागले. तो खेळाडू म्हणजेच बांगलादेशाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा सुपरस्टार तमिम इक्बाल.
क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यात सतत अनेकवेळा संघासाठी कठीण परिस्थिती येत असतात. अशा परिस्थितींमध्ये काही खेळाडू मान टाकतात तर काही खेळाडू याच परिस्थितीला एक संधी समजून तीचे सोन्यात रुपांतर करतात. असं असलं तरी सांघिक खेळात अशाच संधीच सोन्यात रुपांतर करण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांचीही गरज पडते, परंतू सहकाऱ्यांकडून तेवढं सहकार्य मिळत नसतानाही तुम्ही जर मागे हाटत नसाल तर तुम्ही खरे योद्धे असता. असाच काहीसे आपण तमिमबद्दल सहज म्हणून शकतो. भूतकाळात त्याने संघासाठी खूप काही केले असून वर्तमानातही संघाचा कणा म्हणून त्याकडे पाहिले जाते, ते उगीच नाही.
क्रिकेटचा वारसा असलेल्या कुटुंबातला जन्म
चितगाव हे बांगलादेशातील बंदारांचे शहर व दक्षिण बांगलादेशाची आर्थिक राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही हा शहराचे एक वेगळेच महत्त्व आहे. याच शहरात २० मार्च १९८९ रोजी तमिम इक्बालचा जन्म झाला.त्याचे पुर्वज हे बिहारमधून बांगलादेशमध्ये स्थायिक झाले होते. ज्या घरात क्रिकेटचा वारसा अनेक पिढ्यांपासून सुरु होता, अशाच परिवारात तमिमचा जन्म झाला. काका अक्रम खान हे ९०च्या दशकात अखंड बांगलादेशचे क्रिकेट हिरो. सहयोगी देश ते आयसीसीचा पुर्णवेळ सदस्य देश होण्याच्या काळात त्यांनी बांगलादेश संघाची धुरा वाहिली. याच अक्रम खान यांच्या नेतृत्त्वाखाली बांगलादेशचे १९९९ विश्वचषकात पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली होती. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली हा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. दुसऱ्या बाजूला मोठा भाऊ नफिज बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. असा समृद्ध वारसा लाभलेला असताना तमिम देशासाठी नाही खेळणार असे न होण्याची कोणतीही शक्यता नव्हती.
वयाच्या सतराव्या वर्षी खेळला विश्वचषक
तमिमचे वडील मुलांना क्रिकेटचे चांगले धडे मिळावे म्हणून चितगाव शहरात क्रिकेटच्या छोट्या स्पर्धांचे आयोजन करत असे. क्रिकेटचा वारसा असलेल्या घरात जन्म झालेल्या तमिमने एकदा १५० धावांचा पाठलाग करत असलेल्या त्याच्या संघासाठी लहानपणी १४०पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये त्याच्या काकांनीच याची माहिती दिली होती. एवढी मोठी प्रतिभा तमिममध्ये अगदी सुरुवातीपासूनच होती. तो केवळ ११ वर्षांचा असताना वडीलांचे निधन झाले परंतू याचा कोणताही परिणाम चिमुकल्या तमिमने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर होऊ दिला नाही. त्याच्या याच प्रतिभा आणि कणखर स्वभावामुळे वयाच्या १७व्या वर्षीच २००६ साली त्याची बांगलादेशच्या १९ वर्षाखालील संघात विश्वचषकासाठी निवड झाली. १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे एक सलामीवीर म्हणून त्याकडे निवड समितीची लगेच या खेळाडूकडे एक सलामीवीर फलंदाज म्हणून नजर गेली व १८ व्या वयातच त्याला बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.
वयाच्या अठराव्या वर्षी खेळला पहिला आंतरराष्ट्रीय सामना
२००७ साली त्याला झिंबाब्वेविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात वयाच्या १८व्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली परंतू पहिल्याच सामन्यात तो केवळ ५ धावा करुन तंबूत परतला. त्याच्यात प्रतिभाच अशी होती की पहिल्या सामन्यात ५ धावा व पुढील तीन सामन्यात खराब कामगिरी करुनही २००७ क्रिकेट विश्वचषकात त्याला खेळण्याची संधी मिळाली. भारताविरुद्ध झालेल्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात तमिमने शानदार फलंदाजी करत ५१ धावा केल्या. बांगलादेशने प्रथमच विश्वचषकात टीम इंडियाला पराभवाची चव चाखायला लावली व यात सर्वात मोठा वाटा होता तमिम इक्बाल व मर्शफी मुर्तझाचा.
चढ-उतारांनी भरलेली क्रिकेट कारकिर्द
जगाला एक सलामीवीर म्हणून दखल घ्यायला लावल्यानंतर तमिमला आता कारकिर्दीतील यशाची शिखरं चढायची होती. याची सुरुवात त्याने केली ती २००९ साली झालेल्या बांगलादेश विरुद्ध झिंबाब्वे मालिकेतील चौथ्या वनडे सामन्याने. या सामन्यात झिंबाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ३१२ धावा केल्या होत्या परंतू यात एकट्या चार्ल्स कोवर्टीने नाबाद १९४ धावा करत पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या विक्रमाची बरोबरी केली होती. याच सामन्यात धावांचा पाठलाग करत असलेल्या बांगलादेशकडून तमिमने १५४ धावांची खेळी केली होती. त्याने केवळ दिडशतकी खेळीच केली नव्हती तर त्याच्या याच खेळीच्या जोरावर बांगलादेशने झिंबाब्वेला ४ विकेट्सने लोळवले होते. याचमुळे कोवर्टी व तमिमला सामनावीराचा पुरस्कार वाटून दिला होता.
त्यानंतर २०१० सालचा इंग्लंडचा दौरा तमिमसाठी अत्यंत फलदायी ठरला. त्याने लॉर्ड्स आणि ओल्ड ट्रॅफर्ड या दोन्ही कसोटी सामन्यात शतके करण्याचा कारनामा केला. परिणामी तो २०११ साली विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक क्रिकेटपटू ठरला. तसेच त्यानंतर त्याने काऊंटी क्रिकेट खेळण्याचाही निर्णय घेतला. तो काऊंटी खेळणारा दुसराच बांगलादेशी क्रिकेटपटू आहे. तो नॉटिंघमशायर संघाकडून खेळला. एकदातर तो नॉटिंघमशायरकडून वॉर्सेस्टरशायर विरुद्ध खेळत असताना त्याच्यावर बांगलादेशी मीडियाकडून मोठा दबाव टाकण्यात आला होता. कारण त्यावेळी वॉर्सेस्टरशायरकडून शाकिब अल हसन खेळत होता.
असे असले तरी २०११ सालीच तमिमच्या कारकिर्दीत उतारही आला होता. २०११ साली जेव्हा झिम्बाब्वे संघ ६ वर्षांची बंदी पूर्ण करुन कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत होता. त्यावेळी त्यांनी बांगलागेशला कडवी लढत दिली होती. त्यावेळी तमिम केवळ ५८ धावा करु शकला होता. एवढेच नाही तर बांगलादेशला वनडे मालिकाही २-३ अशा फरकाने गमवावी लागली होती. त्यामुळे बांगलादेशने शाकिब आणि तमिम यांना कर्णधार आणि उपकर्णधार पदावरुन पायउतार केले होते. याच वर्षी विश्वचषकही झाला. त्यावेळी तमिमने भारताविरुद्ध ७० धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतरच्या सामन्यांमध्ये तमिमला काहीही खास करता आले नाही.
यानंतरही तमिमच्या कारकिर्दीत काही चढ-उतार आले. दरम्यान, बांगलादेश प्रीमीयर लीगची सुरुवात झाल्यानंतर तमिम हा चितगांव किंग्स संघाचा आयकॉन प्लेअर होता. मात्र त्याला पहिल्याच हंगामात दुखापतीमुळे केवळ २ सामने खेळता आले. या हंगामापाठोपाठ आशिया चषक २०१२ ही स्पर्धा पार पडली. अनेक गोष्टींमुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली. त्यात मग सचिनचे १०० वे शतक असो. भारतीय संघाचे पराभव असो. त्यातीलच एक चर्चेचा मोठा विषय म्हणजे तमिम इक्लाब हा देखील होता. त्या स्पर्धेवेळी तमिमला टायफाईड झाला होता आणि तो त्या आजारातून सावरत होता. तसेच त्यावेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मुस्तफा कमल यांच्या आज्ञेवरुन तमिमला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे वाद वाढले, पण अखेर त्याचा संघात समावेश करण्यात आला. तमिमनेही ही स्पर्धा गाजवली. त्याने या स्पर्धेत ४ अर्धशतके झळकावली. तो स्पर्धेतील विराट कोहलीनंतरचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. इतकेच नाही तर अंतिम सामना केवळ २ धावांनी बांगलादेश पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाले होते.
२०१२ सालीच तमिमने न्यूझीलंडमधील एचआरव्ही कप या देशांतर्गत स्पर्धेसाठी वेलिंग्टन फायरबर्ड संघासह करार केला होता. त्यावेळी तो न्यूझीलंडमध्ये देशांतर्गत स्पर्धा खेळणारा पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला होता. २०१३ सालचा बांगलादेशचा श्रीलंका दौरा तमिमसाठी मिश्रित अनुभवांचा ठरला. त्याला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. पण दुसऱ्या कसोटीत तो खेळला. त्यानंतर वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने शतकासह एक इतिहास रचला. तो श्रीलंकेविरुद्ध शतक करणारा पहिला बांगलादेशचा क्रिकेटपटू ठरला.
लग्नाला पंतप्रधानांची उपस्थिती
२०१३ सालात तमिमच्या वैयक्तिक आयुष्यातही खुप खास ठरलं. त्यावर्षी त्याचा जून महिन्यात आयेशा सिद्दिका हिच्याशी विवाह झाला. त्यांच्या विवाहासाठी माजी पंतप्रधान खालिदा झिया यांनीही उपस्थिती लावली होती.
बांगलादेश क्रिकेटचा कणा बनून उभा राहिला
तमिमसाठी २०१४ वर्षाची सुरुवात फारशी बरी नव्हती. तो त्यावेळी दुखापतीशी झगडत होता. तसेच त्यावर्षी त्याला आशिया चषक आणि टी२० विश्वचषकातही कमाल दाखवता आली नाही. मात्र त्याने २०१५ च्या वनडे विश्वचषकही त्याच्यासाठी खास ठरला नाही. या विश्वचषकानंतर मात्र त्याने जोरदार पुनरागमन केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध वनडेत सलग २ शतकं ठोकली. तसेच कसोटीतही त्याने द्विशतकी धमाका केला. ज्यामुळे बांगलादेशला पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच सामना अनिर्णित राखण्यात यश आले. त्याचवर्षी तो भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांगलादेशने मिळवलेल्या मालिका विजयांमध्ये महत्त्वाचा खेळाडू ठरला होता.
तमिमने २०१६ साली मात्र आशिया चषकातून माघार घेतली. त्याने त्याच्या पहिल्या अपात्याच्या जन्मासाठी ही माघार घेतली होती. त्याला २०१६ साली पुत्रप्राप्ती झाली. त्यानंतर त्याने २०१६ च्या टी२० विश्वचषकातून पुनरागमन केले. त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये तो इंग्लंडविरुद्ध खेळताना वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करणारा पहिला बांगलादेशचा खेळाडू ठरला. त्याने वनडे मालिकेनंतर कसोटी मालिकाही गाजवली. त्याने इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केली. त्यामुळे बांगलादेशला इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी विजय मिळवता आला. त्यानंतर तमिमसाठी २०१७ची सुरुवात खास नव्हती. पण तो लवकरच फॉर्ममध्ये परतला. तसेच बांगलादेशच्या ऐतिहासिक १०० व्या कसोटी सामन्यात त्याने ८२ धावांची अत्यंत महत्त्वाची खेळी केली. त्याला त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही मिळाला.
बांगलादेशने २०१६-१७ या दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये खरोखर प्रगती केली. त्यांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघांना पराभूत करण्याचा कारनामा केला आणि यात तमिमचा वाटा फार मोठा होता. २०१८ साली तमिमला कसोटीत काही कमाल करता आली नाही. मात्र वनडेत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध २ शतके झळकावली. २०१९ च्या विश्वचषकातही तमिमची बॅट फार तळपली नाही. पण यावर्षी त्याने न्यूझीलंडमध्ये हेमिल्टन येथे खेळताना कसोटीत शतकी खेळी करण्याची कमाल केली. त्याने न्यूझीलंडमध्ये २ कसोटी सामन्यात १ शतक आणि २ अर्धशतके केली. मात्र त्याची झुंज बांगलादेशला विजय मिळवून देऊ शकली नाही. २०२०मध्ये काही महिने कोरोनामुळे वाया गेले. त्यातही असले तरी त्याने फॉर्म कायम राखला. त्याने वनडेत झिम्बाब्वेविरुद्ध सलग २ शतकं केली. जानेवारी २०२१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २ अर्धशतके झळकावली.
त्याच्या कारकिर्दीत त्याने बांगलादेशचे नेतृत्वही केले. गेल्या दशकभर बांगलादेशचा कणा बनून राहिलेला तमिम आजही संघाचा प्रमुख खेळाडू आहे. त्याने बांगलादेशला एक संघ म्हणून क्रिकेटमध्ये उभारी घेताना पाहिले आहे. यादरम्यान तो अनेक मानहानिकारक पराभवांबरोबरच अविस्मरणीय विजयांचा साक्षीदार राहिला आहे. अनेक चढ-उतारांनंतरही बांगलादेश क्रिकेटमध्ये आपले स्थान सुस्थितीत राखून आहे, यासाठी तमिमचे योगदानही खूप मोठे आहे. त्यामुळे पुढील बांगलादेशमधील क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी तमिम हा एक आदर्श असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवासाठी मिताली राजने ‘या’ गोष्टीला धरले जबाबदार; म्हणाली…
‘आता आमच्याकडे चहल आणि अश्विन आहे’, राजस्थान रॉयल्सच्या प्रमुख सदस्याने भरली हुंकार