येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने असणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. तर न्यूझीलंड संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे.
हा सामना विराट कोहली आणि केन विलियमसनसाठी ही तितकाच महत्वाचा असणार आहे. कारण या दोघांनाही आतापर्यंत वरिष्ठ स्तरावर आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यात यश आले नाहीये. तसेच या दोन्हीही संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांचे एकमेकांसोबत खूप जुने नाते आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीसह, रवींद्र जडेजाचा देखील समावेश आहे. जडेजा आपल्या फिरकी गोलंदाजीने आणि आक्रमक फलंदाजीने भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देऊ शकतो. तर न्यूझीलंड संघाकडून कर्णधार केन विलियमसनसह ट्रेंट बोल्ट आणि टीम साउथी हे खेळताना दिसून येणार आहेत. या पाचही खेळाडूंचे एकमेकांसोबत खास नाते आहे.
हे खेळाडू २००८ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत एकमेकांविरोधात खेळले होते. त्यावेळी देखील भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले होते. तसेच न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केन विलियमसनच्या हाती होते.
१९ वर्षांखालील विश्वचषक २००८ मध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २०५ धावा केल्या होत्या. तसेच केन विलियमसनने या सामन्यात ३७ धावांची खेळी केली होती. या सामन्यात विराट कोहलीला २ गडी बाद करण्यात यश आले होते. तर जडेजाने एक गडी बाद केला होता.
तसेच धावांचा पाठलाग करत असताना, पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे भारतीय संघाला ४३ षटकात १९१ धावा करण्याचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान भारतीय संघाने ४१.३ षटकात पूर्ण केले होते. विराट कोहलीने या सामन्यात ४३ धावांची खेळी केली होती. तर जडेजाला एक धाव करण्यात यश आले होते. तसेच न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना, टीम साउथीने ४ गडी बाद केले होते. तर ट्रेंट बोल्टला एक गडी बाद करण्यात यश आले होते.
यानंतर २०१५ आणि २०१९ च्या वनडे विश्वचषकादरम्यान देखील हे खेळाडू आमने-सामने आले होते.
The glow up of all glow ups.
From 2008 U19 @cricketworldcup semi-final talents, to #WTC21 final titans 🏏 pic.twitter.com/hBracC1m52
— ICC (@ICC) June 8, 2021
भारतीय संघ न्यूझीलंड संघावर पडणार भारी? पाहा आकडेवारी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांची आकडेवारी पाहिली तर भारतीय संघाचे पारडे जड आहे. दोन्ही ही संघांनी तीनही प्रकारामध्ये आतापर्यंत एकूण १८५ सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला ८२ सामने जिंकण्यात यश आले आहे. तर न्यूझीलंड संघाने ६९ सामन्यात विजय मिळवला आहे.
दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाने २१ विजय मिळवले आहेत. तर न्यूझीलंड संघाला १२ सामने जिंकण्यात यश आले आहे. तसेच ११० वनडे सामन्यात भारतीय संघाला ५५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर न्यूझीलंड संघाने ४९ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.
टी-२० सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर १६ टी -२० सामन्यांमध्ये भारतीय संघाने ६ सामन्यात विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंड संघाला ८ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘दादा’ गिरी! ट्रोल झाल्यानंतरही गांगुली यांनी पुन्हा पोस्ट केले ‘ते’ छायाचित्र
“हे भारताचे मागील २० वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण”
कलम ३७० चा भारतीय वाहिन्यांना बसणार आर्थिक फटका? क्रिकेट प्रक्षेपणासाठी भारतीय कंपन्यांना दिला नकार