भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2 -1 ने विजय मिळवला आहे. भारताच्या या यशात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची भूमिका पार पाडली. पुजाराने ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आपल्या शरीरावर अनेक जखमा घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. पुजाराच्या या अविश्वसनीय खेळीबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाडून त्याचे कौतुक केले जात आहे. पुजाराला एक उत्तम कसोटीपटू मानले जाते, मात्र अशातच पुजाराने इच्छा व्यक्त केली आहे की त्याला अजूनही भरताकडून मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्याची आशा आहे.
एका कार्यक्रमादरम्यान पुजारा म्हणाला, “मला अजूनही भारताकडून सफेद चेंडूच्या क्रिकेटमध्ये (मर्यादित षटकांचे क्रिकेट) खेळण्याची आशा आहे. याबद्दल कुठलेही दुमत नाही.”
यासोबतच पुजाराने लॉकडाऊन काळात क्रिकेट सरावादरम्यान आलेल्या अडचणींचा देखील खुलासा केला आहे. पुजारा म्हणाला, “ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाण्यापूर्वी लॉकडाऊनमुळे मी कुठलाही सराव सामना खेळलेला नव्हता. त्यामुळे इतक्या मोठ्या मालिकेसाठी सराव करताना ही बाब अवघड ठरत होती. जर कोरोना नसता तर मी काही प्रथम श्रेणी सामने खेळले असते.”
पुजारा पुढे म्हणाला,”कोरोनामुळे जास्त प्रथम श्रेणी सामने झाले नाहीत. मालिका सुरू होण्यापूर्वी मी केवळ एक सराव सामना खेळला होता. मला एकाग्रता मिळवणे अवघड जात होते, मात्र काही सामने खेळल्यानंतर मी लयीमध्ये आलो.”
पुजाराने भारताकडून वनडे क्रिकेट खेळण्याची इच्छा जरी व्यक्त केली असली, तरी त्याने मागील बऱ्याच वर्षांपासून वनडे सामने खेळलेले नाहीत. पुजाराने आपल्या वनडे कारकिर्दीत केवळ 5 सामने खेळलेले असून, त्याला त्यात कुठलीही विशेष कामगिरी करता आली नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने आपले कसोटी कौशल्य पुन्हा एकदा दाखवून दिले.
पुजाराने शेवटच्या कसोटी सामन्यात झुंजार अर्धशतक झळकावले होते. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी त्याने दुखापतग्रस्त असून देखील शानदार फलंदाजी केली. पुजाराने तब्बल 211 चेंडू खेळून काढत 7 चौकरांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. पुजराच्या या खेळीमुळेच शुभमन गिल व रिषभ पंत यांना आक्रमक खेळी करण्याची संधी मिळाली व भारतीय संघ इतिहास रचत सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
“क्रिकेट ग्राउंडच विकत घे,” इरफान पठानचा रिषभ पंतच्या ‘त्या’ पोस्टवर मजेशीर सल्ला