आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात होण्यासाठी केवळ १५ दिवस उरले आहेत. तत्पुर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे १९ सप्टेंबर रोजी होणारा आयपीएलचा सामना आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात (RCB Vs MI) खेळला जाणार आहे. पुर्वी हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार होता.
अशात, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली त्याच्या संघातील कोणत्या ११ खेळाडूंना घेऊन मैदानावर उतरेल, याची उत्सुकता सर्वांना लागली असेल. या लेखात आम्ही विराटच्या संभावित एकादश संघाचा आढावा घेतला आहे.
असा असेल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संभावित प्लेइंग इलेव्हन संघ (RCB Playing Xi Of IPL 2020 First Match)-
१. ऍरॉन फिंच
आयपीएल २०२०च्या खेळाडू लिलावात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचला ४ कोटी ४० लाख रुपयांना आपल्या संघात विकत घेतले होते. तो एक जबरदस्त सलामीवीर फलंदाज आहे. आजवर त्याने ऑस्ट्रेलिया टी२० संघाकडून सामन्याची सुरुवात करताना दमदार फलंदाजी प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्याला आरसीबीकडून सलामीला फलंदाजीला पाठवले जाऊ शकते.
२. पार्थिव पटेल
कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिल्या सामन्यात ऍरॉन फिंचसोबत सलामीला फलंदाजी करण्याची जबाबदारी पार्थिव पटेलच्या खांद्यावर टाकू शकतो. पार्थिव गेल्या काही वर्षांपासून आरसीबीकडून सलामीला फलंदाजी करत आहे. त्याच्या आकडेवारींविषयी बोलायचं झालं तर, पार्थिवने १३९ सामने खेळत १२०.७८च्या स्ट्राईक रेटने २८४८ धावा केल्या आहेत. याबरोबच तो एक दमदार यष्टीरक्षक असल्यामुळे संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारीही तोच सांभाळेल.
३. विराट कोहली (कर्णधार)
आयपीएल २०२०च्या केवळ पहिल्या समान्यातच नव्हे तर, सर्व सामन्यात विराट कोहली हा संघातील अंतिम ११ खेळाडूंपैकी एक असणे निश्चित आहे. कारण तो संघाचा कर्णधार आहे. जरी विराटने आपल्या नेतृत्त्वाखाली आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएल विजेता बनवले नसले, तरी त्याची आणि त्याच्या संघाच्या प्रदर्शनाची नेहमी चर्चा होत असते. विराट आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आरसीबीचा भाग आहे. त्याने आतापर्यंत आरसीबीकडून १७७ सामन्यात १३१.६१च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत.
४. एबी डिविलियर्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फलंदाज एबी डिविलियर्स हा संघातील मॅच विनर खेळाडूंपैकी एक आहे. परिणामत तोदेखील आयपीएलच्या पहिल्या सामन्यातच नव्हे तर हंगामातील सर्व सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजीची कमान सांभाळताना दिसेल. तरी यंदा अशी वृत्ते ऐकायला येत आहेत की, यष्टीरक्षक फलंदाज डिविलियर्सवर आरसीबीच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. परंतु, संघाचा कर्णधार विराटने किंवा संघाने याची कोणतीही पुष्टी दिली नाही.
५. मोईन अली
आरसीबीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अली हा संघाच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असेल. कारण, अली हा मधल्या फळीत फलंदाजी करण्याबरोबर गोलंदाजीतही आपले योगदान देऊ शकतो. तो एक शानदार फिरकीपटू गोलंदाज आहे आणि युएईतील मैदाने ही फिरकी गोलंदाजांसाठी खूप सोईस्कर आहेत.
६. शिवम दुबे
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा एकादश संघाचा भाग असेल. तो संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतो. सोबतच तो सामन्यामध्ये एक दमदार पर्यायी वेगवान गोलंदाज ठरु शकतो. गतवर्षी विराटने दुबेला केवळ ४ सामन्यात खेळण्याची संधी दिली होती. पण, यंदा त्याला अधिक सामने खेळायला मिळू शकतात.
७. वॉशिंग्टन सुंदर
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आरसीबीच्या पहिल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला खेळण्याची संधी मिळू शकते. तो एक शानदार फिरकीपटू अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे मधल्या फळीत फलंदाजी करण्याव्यतिरिक्त तो फिरकी गोलंदाजीही करु शकतो. आतापर्यंत वॉशिंग्टनने आयपीएलच्या २१ सामन्यातील १३ डावात फलंदाजी करताना ७५ धावा केल्या आहेत. तर, २० डावात गोलंदाजी करताना त्याने १६ विकेट्स चटकावल्या आहेत.
८. क्रिस मॉरिस
आयपीएल २०२०च्या खेळाडू लिलावात आरसीबीने दक्षिण आफ्रिकाच्या क्रिस मॉरिसला १० कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले आहे. एवढ्या महागड्या किंमतीवर त्यांनी या शानदार वेगवान गोलंदाजाला आपल्या संघात सामील केले आहे, त्यामुळे ते नक्कीच आयपीएलच्या पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी देतील. मॉरिसने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६१ सामने खेळत ६९ विकेट्स चटकावल्या आहेत.
९. उमेश यादव
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवला कर्णधार विराट कोहली आयपीएल २०२०च्या फक्त पहिल्या सामन्यातच नव्हे तर सर्व सामन्यात एकादश संघात संधी देऊ शकतो. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ११९ सामने खेळत १९९ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. तर, ३७ डावात फलंदाजी करत त्याने १२२ धावा आपल्या खात्यात जोडल्या आहेत.
१०. नवदीप सैनी
वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हादेखील त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्याला आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामात खेळण्याची संधी देऊ शकतो. गतवर्षीच या खेळाडूने आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पूर्ण हंगामात त्याला १३ सामने खेळायला मिळाले. दरम्यान त्याने ११ विकेट्स घेतल्या होत्या. यंदा तो यापेक्षाही दमदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
११. युझवेंद्र चहल
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आपल्या दमदार गोलंदाजीच्या बळावर संघाला यंदा आयपीएलचा विजेता बनवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. युएईची क्रिकेट मैदाने फिरकीपटूंसाठी सोईस्कर असल्यामुळे सध्या फिरकीपटूंचा पूर्ण हंगामात बोलबाला असेल. चहलदेखील एक दमदार फिरकीपटू आहे, त्यामुळे तो ही सुवर्णसंधी सोडणार नाही.
ट्रेंडिंग लेख-