भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या. यष्टीरक्षण, कर्णधारपद व एक खेळाडू अशा तिनही जबाबदाऱ्या त्याने लिलया पार पाडल्या आहेत. धोनीचा आज ४० वा वाढदिवस आहे. त्याच्या याच वाढदिवसानिमित्त त्याच्या नावावर असलेल्या काही विक्रमांवर नजर टाकू, जे विक्रम कोणत्याही क्रिकेटपटूला मोडणे कठीण जाऊ शकते.
५. आयसीसीच्या सर्व ट्राॅफी जिंकणारा जगातील एकमेव
एमएस धोनीने कर्णधार म्हणून २००७ साली टी२० विश्वचषक, २०११ साली क्रिकेटविश्वचषकत र २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धा जिंकली. आयसीसीच्या या तीन मुख्य स्पर्धा वरिष्ठ गटातील क्रिकेटपटूंसाठी असतात. आयसीसीने चॅम्पियन्स ट्राॅफी ही स्पर्धा रद्द केली आहे. त्यामुळे ती पुढे कोणताही कर्णधार जिंकण्याची शक्यता नाही. याचबरोबर धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट टीम आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आली होती.
४. सहा टी२० विश्वचषकात संघाचं नेतृत्त्व करणारा एकमेव कर्णधार
धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने २००७ साली टी२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर धोनीने पुढील ५ विश्वचषकातही भारतीय संघाचे नेतृत्त्व केले. २००७, २००९, २०१०, २०१२, २०१४ व २०१६ अशा ६ विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्त्व धोनीकडे होते. यातील २०१४ विश्वचषकात भारत श्रीलंकेकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला. २०१६मध्ये भारतीय संघ उपांत्यफेरीतून बाहेर पडला.
९ वर्षांत केवळ ४ किंवा ५ वेळा विश्वचषक होणे अपेक्षित असताना तो ६ वेळा झाला. त्यामुळे धोनीला नेतृत्त्व करण्याची मोठी संधी मिळाली. एवढे विश्वचषक नेतृत्त्व करण्यासाठी खेळाडूने १०-१२ वर्ष टी२०मध्ये चांगला फाॅर्म खेळाडू व कर्णधार म्हणून ठेवला तरच असा कारनामा करता येऊ शकतो.
३. आयसीसी वनडे क्रमवारीत जलद अव्वल स्थानी येणारा फलंदाज
एमएस धोनी पदापर्णानंतर केवळ ३ वर्षात भारतीय संघाचा कर्णधार झाला. २००५ वर्षात केलेल्या मोठ्या खेळींमुळे ४२ डावानंतरच तो आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता. पदार्पणानंतर एवढ्या लवकर क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणारा तो पहिलाच खेळाडू.
२. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळाडूंना यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक
आपल्या यष्टीरक्षणाच्या अनोख्या शैलीमुळे एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखला जातो. ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या धोनीने यात तब्बल १९५ खेळाडूंना यष्टीचीत केले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. त्याने १३९ यष्टीचीत केले आहेत. सध्या खेळत असलेल्या कोणत्याही यष्टीरक्षकाकडून एवढ्या मोठ्या विक्रमाची अपेक्षा नाही.
१. कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने
एमएस धोनीने तब्बल ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्त्व केले आहे. ५३८ सामन्यांपैकी ३३२ सामन्यात संघाचे नेतृत्त्व करणे नक्कीच छोटी गोष्ट नाही. तब्बल १० वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये धोनीने देशाचे नेतृत्त्व केले आहे. २००७ टी२० विश्वचषकादरम्यान कर्णधार झालेल्या धोनीने २०१४साली कसोटी तर २०१७मध्ये वनडे व टी२०चे कर्णधारपद सोडले. धोनीनंतर सर्वाधिक सामन्यात रिकी पाॅटींगने (३२४) संघाचे नेतृत्त्व केले आहे.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण