तुम्ही जर क्रिकेटचे चाहते असाल आणि त्यातही तुम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट सामने पहायला आवडत असतील तर ही आहे तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज. स्टार स्पोर्ट्स १ वर भारत विरुद्ध पाकिस्तानमधील विश्वचषकातील सर्व सामने दाखविण्यात येणार आहे.
हे पुर्नप्रक्षेपण ४ ते १० एप्रिल दरम्यान होणार असून यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपुर्ण सामना यात दाखविण्यात येणार आहे. यापुर्वी प्रेक्षकांना केवळ हाईलाईट्सवर समाधान मानावे लागत असे.
याचबरोबर २०११ विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्याच्या हायलाईट्स आज अर्थात ३० मार्च रोजी दुपारी २ तर विश्वचषक २०११ फायनल २ एप्रिल २०२० रोजी दुपारी २ वाजता दाखविण्यात येणार आहे. हे सामने स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १ एचडी व स्टार स्पोर्ट्स फस्टवर दाखविण्यात येतील.
भारतीय संघ विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकूण ७ सामने खेळला असून त्यात ७ पैकी ७ विजय मिळवले आहेत. १९९२ ते २०१९ या काळात भारत हे ७ सामने खेळला आहे.
भारताकडून या ७ पैकी ५ लढतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर संघाचा भाग होता. त्याने या ५ सामन्यात ७८.२५च्या सरासरीने ३१३ धावा केल्या आहेत. परंतु पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात भारताकडून केवळ विराट व युवराजला शतकी खेळी करता आली आहे.
असे होणार सामन्यांचे प्रक्षेपण-
१९९२ विश्वचषक- ४ एप्रिल २०२०
१९९६ विश्वचषक- ५ एप्रिल २०२०
१९९९ विश्वचषक- ६ एप्रिल २०२०
२००३ विश्वचषक- ७ एप्रिल २०२०
२०११ विश्वचषक- ८ एप्रिल २०२०
२०१५ विश्वचषक- ९ एप्रिल २०२०
२०१९ विश्वचषक- १० एप्रिल २०२०